KKR won against DC by 106 runs in IPL Match No 16 : आयपीएल २०२४ मधील १६ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात विशाखापट्टणम येथे खेळला गेला. या सामन्यात केकेआरने प्रथम फलंदाजी करताना २७२ धावा करत आयपीएलमधील इतिहासातील दुसरी सर्वात मोठी धासंख्या उभारली होती, ज्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सचा संघ १६६ धावांवर गारद झाला. ज्यामुळे केकेआरने मोठा विजय मिळवता सामना १०६ धावांनी खिशात घातला. या विजयासह सलग तिसरा सामना जिंकत गुणातालिकेत अव्वल स्थान काबीज केले.
केकेआरसाठी सुनील नरेन आणि अंगक्रिश रघुवंशी यांच्या अर्धशतकांव्यतिरिक्त आंद्रे रसेलच्या ४१ धावांच्या तुफानी खेळीनेही कोलकाताला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले. त्यामुळे केकेआरने २० षटकांत ७ बाद २७२ धावा करताना दिल्ली कॅपिटल्सपुढे २७३ लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात खूपच खराब झाली होती. ज्यातून त्यांना शेवटपर्यंत सावरता आले नाही. दिल्लीसाठी कर्णधार ऋषभ पंतने ५५ धावा केल्या आणि ट्रिस्टन स्टब्सने ५४ धावांची अर्धशतकी खेळी खेळली असली, तरी संघाला १०६ धावांच्या पराभवापासून वाचवता आले नाही.
केकेआरने उभारली आयपीएलच्या इतिहासातील दुसरी सर्वोच्च धावसंख्या –
कोलकाता नाईट रायडर्सने विशाखापट्टणममध्ये मोठी धावसंख्या उभारली आहे. त्यांनी २० षटकांत ७ गडी गमावून २७२ धावा केल्या. ही आयपीएलमधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या आहे. या मोसमात आयपीएलची सर्वात मोठी धावसंख्याही नोंदवली गेला. सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सविरुद्ध (२७ मार्च) २७७ धावा केल्या होत्या. त्याच वेळी, एकूण टी-२० क्रिकेटमध्ये ही आठव्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या आहे. २७१ धावा ही कोलकात्याची आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी २०१८ मध्ये त्याने पंजाबविरुद्ध सहा विकेट्सवर २४५ धावा केल्या होत्या.
केकेआरसाठी फिल सॉल्ट आणि सुनील नरेन यांनी डावाची सुरुवात केली. सॉल्ट केवळ १८ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला असला, तरी त्यानंतर सुनील नरेन आणि अंगक्रिश रघुवंशी यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी १०४ धावांची भागीदारी झाली. एकीकडे नरेनने ३९ चेंडूत ७ चौकार आणि ७ षटकारांसह ८५ धावांची तुफानी खेळी केली. तर आयपीएलमधील पदार्पणाच्या डावात अंगक्रिशने २७ चेंडू खेळून ५४ धावा केल्या. या खेळीत त्याने ५ चौकार आणि ३ षटकार मारले. शेवटच्या षटकांमध्ये आंद्रे रसेलने ४१ धावा केल्या, तर रिंकू सिंगनेही ८ चेंडूत २६ धावांची छोटीशी खेळी खेळून महत्त्वपूर्ण योगदान दिले. कोलकाताने पहिल्या १० षटकात १३५ धावा आणि शेवटच्या १० षटकात १३७ धावा करत दिल्लीच्या गोलंदाजांचा घाम फोडला.
ऋषभ पंत आणि ट्रिस्टन स्टब्सची खेळी व्यर्थ ठरली –
दिल्ली कॅपिटल्ससाठी डावाची सुरुवात खूपच खराब झाली. डीसीने पहिल्या ३३ धावांत ४ महत्त्वाचे विकेट गमावले होते. त्यानंतर ऋषभ पंत आणि ट्रिस्टन स्टब्स यांच्यात पाचव्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी झाली, पण डीसीला विजयापर्यंत नेण्यासाठी ती अपुरी ठरली. पंतने २५ चेंडूत ५५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी ,तर स्टब्सने ३२ चेंडूत ५४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. त्यानंतर संघाने सातत्याने विकेट गमावल्या, त्यामुळे दिल्लीला १०६ धावांनी मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.
हेही वाचा – IPL 2024 : मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी! सूर्यकुमार यादव झाला तंदुरुस्त, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता
केकेआरच्या गोलंदाजांचाही राहीला दबदबा –
फलंदाजीसोबतच गोलंदाजीतही कोलकाता नाईट रायडर्सने आपला दबदबा कायम राखला. वरुण चक्रवर्तीने ४ षटकात ३३ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. त्याचवेळी मिचेल स्टार्कने आयपीएल २०२४ मध्ये विकेटचे खातेही उघडले आहे. त्याने ३ षटकात २५ धावा देत २ विकेट्स घेतल्या. दरम्यान, वैभव अरोरानेही प्रभावित केले, ज्याने ४ षटकात २७ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. सुनील नरेन आणि आंद्रे रसेल यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली.