दिल्ली कॅपिटल्सचा युवा सलामीवीर जेक फ्रेझर-मॅकगर्कने मुंबई इंडियन्सविरुद्ध २७ चेंडूत ८४ धावांची शानदार खेळी केली. अनुभवी पियुष चावलाच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात जेक फ्रेझर बाद झाल्याने त्याचे शतक अवघ्या काही धावांनी हुकले. या २२ वर्षीय सलामीवीराने अवघ्या १५ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. सनरायझर्स हैदराबादविरुद्धही त्याने १५ चेंडूंत अर्धशतक ठोकले होते. आता हंगामातील सर्वात जलद अर्धशतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिले आणि दुसरे स्थान या विस्फोटक फलंदाजाच्या नावे आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सामन्याच्या पहिल्याच षटकात ल्यूक वुडविरुद्ध १९ धावा केल्यानंतर जेक फ्रेझरने बुमराहला दुस-याच षटकात चकित केले. बुमराहच्या अगदी पहिल्याच चेंडूवर षटकार मारून त्याने त्याचे स्वागत केले, पण तोही नो बॉल होता. फ्री हिट असल्याने पुढचा चेंडूही मिडऑनला चौकारासाठी त्याने लगावला. शेवटच्या चेंडूवरही चौकार मारला. बुमराहने या षटकात १८ धावा दिल्या, हे त्याचे मोसमातील सर्वात महागडे षटक देखील होते.

सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर जेकला बुमराहविरूद्ध फटकेबाजी करण्याबद्दल विचारताना त्याने सांगितले, “नक्कीच बुमराहसमोर फलंदाजी करताना दडपण आले होते. मी बुमराहच्या गोलंदाजीचे दिवसभर व्हीडिओ पाहत होतो. पण सामन्यात सर्व काही यापलीकडे असते आणि तुम्हाला चेंडू पाहून खेळायचे असते. जगातील सर्वोत्तम गोलंदाजाविरूद्ध स्वतला तपासून पाहणं, ही चांगली गोष्ट आहे. आपल्याला नेहमी चढउतारांना सामोरं जावं लागतं. अशा खेळी माझ्या आत्मविश्वासाठी आणि माझ्या संघासाठी महत्त्वाच्या आहेत. बाहेरून पाहताना ही स्पर्धा किती मोठ्या स्तरावर खेळवली जाते याचा अंदाज येत नाही. आयपीएल ही इतर लीगपेक्षा खूप मोठी आहे आणि त्याचा भाग बनणं ही खूप मोठी गोष्ट आहे.” जेक फ्रेझरला त्याच्या या शानदार खेळीसाठी सामनावीर पुरस्कारासहित इतरही पुरस्कार मिळाले.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dc vs mi jake fraser mcgurk statement on bumrah said i had looked at jasprit bumrah footage videos all day ipl