What was The Turning Point of Mumbai Indians win IPL 2025: मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२५ मध्ये जोरदार पुनरागमन केलं आहे. सलग दोन सामने गमावल्यानंतर मुंबईचं नशीब उजळलं आणि संघाने थरारक विजयाची नोंद केली. दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानावर मुंबईने दिल्लीच्या जबड्यातून विजय हिसकावून घेतला.१९व्या षटकात सलग तीन चेंडूवर तीन खेळाडू धावबाद होत मुंबईने अनोखा विजय नोंदवला. पण मुंबईच्या विजयाचा नेमका टर्निंग पॉईंट काय ठरला? जाणून घेऊया.
२०२५ च्या आयपीएलमध्ये आतापर्यंत दिल्लीचा संघ विजयाच्या रथावर स्वार होता. या सामन्यातही दिल्लीचा संघ विजयाच्या उंबरठ्यावर होता, पण शेवटी संघाने ६४ धावांच्या आत ९ विकेट गमावल्या, ज्यामध्ये सलग तीन खेळाडू धावबाद होण्याचा चमत्कार पाहायला मिळाला. एवढंच नाही तर एक फलंदाज स्टंपिंगवरही बाद झाला. दिल्लीकडून करुण नायरने ८९ धावांची खेळी केली, पण दुर्दैवाने त्याची मेहनत वाया गेली.
कर्ण शर्माला आज या सामन्यात इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने संधीचं सोन करत मुंबईसाठी विजयाची कहाणी लिहिली. कर्ण शर्माने अभिषेक पोरेलला झेलबाद करत पहिली विकेट मिळवली. यानंतर पुढच्या षटकात सँटनरने करूण नायरला क्लीन बोल्ड केलं. तोपर्यंत मैदानावर बरंच दव आलं होतं. तर बुमराहने १३व्या षटकात अक्षर पटेलला झेलबाद केलं. इतक्यात डगआऊटमधून हालचाल दिसली.
DC vs MI: मुंबई इंडियन्सच्या विजयाचा काय होता टर्निंग पॉईंट?

मुंबई इंडियन्सचा संघ १४व्या षटकानंतर नवा चेंडू घेत होता. आयपीएलमधील नव्या नियमानुसार दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना जर दव असेल तर गोलंदाजी करणारा संघ नवीन चेंडू घेऊ शकतो. मुंबईने या नियमाचा वापर केला. तितक्यात रोहित शर्माने डगआऊटमधून इशारा केला की दोन्ही बाजूंनी फिरकीपटूला गोलंदाजी द्या. रोहितने संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांच्याबरोबर या निर्णयाची चर्चा केली आणि नंतर कोचला देखील माहिती दिली.

मैदानावर हार्दिकनेही रोहित आणि कोचच्या या निर्णयाची लगेच अंमलबजावणी केली आणि कर्ण शर्माला चेंडू दिला. त्याने तिसऱ्या चेंडूवर ट्रिस्टन स्टब्सला नमन धीरकरवी झेलबाद केलं आणि षटकात फक्त ६ धावा दिल्या. तर १५वं षटक मिचेल सँटनरने टाकलं त्याने या षटकात ७ धावा दिल्या. पुन्हा पुढील १६वं षटक कर्ण शर्माने टाकलं ज्याने या षटकातील तिसऱ्या चेंडूवर केएल राहुलला बाद करत दिल्लीला मोठा धक्का दिला आणि मुंबईसाठी मोठी विकेट मिळवली. या तीन षटकांमध्ये सामना पालटला.

रोहित शर्माच्या या निर्णयाचा लगेच फायदा झालेला पाहून मुंबई इंडियन्सचे गोलंदाजी कोच पारस म्हांब्रे यांनी रोहित शर्माच्या हातावर शाबासकी दिली. रोहित शर्मा यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळताना दिसतो. या सामन्यातही रोहित शर्मा पॉवरप्लेमध्ये फिल्डिंगसाठी उतरला. पण नंतर पॉवरप्लेनंतर कर्ण शर्माला त्याच्या जागी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून उतरवल्याने रोहित शर्मा डगआऊटमध्ये होता. पण तिथूनही रोहित शर्माने आपल्या अनुभवाचा वापर करत संघासाठी मोलाचं योगदान दिलं.