IPL 2025 Kuldeep Yadav Injury Update: दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात आयपीएल २०२५ स्पर्धेतील पहिली सुपर ओव्हर पाहायला मिळाली. सुपर ओव्हरमध्ये दिल्लीच्या फलंदाजांनी बाजी मारली आणि दिल्लीने हा सामना आपल्या नावावर केला. या शानदार विजयासह दिल्लीचा संघ १० गुणांसह अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. मात्र या सामन्यानंतर दिल्ली कॅपिटल्स संघाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे.
या सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना दिल्लीचा स्टार गोलंदाज कुलदीप यादव दुखापतग्रस्त झाला आहे. बाऊंड्री लाईनवर क्षेत्ररक्षण करत असताना त्याच्या खांद्याला जबर दुखापत झाली. त्याची दुखापत गंभीर असल्याचं दिसून आलं. त्यामुळे त्याला मैदान सोडून बाहेर जावं लागलं. ही केवळ दिल्ली कॅपिटल्स संघासाठीच नव्हे, तर भारतीय संघासाठी देखील टेन्शन वाढवणारी बाब आहे. कारण कुलदीप यादव हा भारतीय संघातील प्रमुख फिरकी गोलंदाजांपैकी एक आहे.
नेमकं काय घडलं?
कुलदीप यादव दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यादरम्यान दुखापतग्रस्त झाला. तर झाले असे की, राजस्थानची फलंदाजी सुरु असताना १७ व्या षटकात नितीश राणाने जोरदार फटका खेळला. त्यावेळी कुलदीप यादव बाऊंड्री लाईनजवळ क्षेत्ररक्षण करत होता. वेगाने येणारा चेंडू अडवण्यासाठी कुलदीप यादवने पूर्ण जोर लावला. मात्र चौकार जाण्यापासून थांबवण्यात त्याला यश आलं नाही. चेंडू अडवताना त्याच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली.
कुलदीप यादवच्या दुखापतीबाबत अक्षर पटेल काय म्हणाला?
हा सामना जिंकल्यानंतर कर्णधार अक्षर पटेलला कुलदीप यादवच्या दुखापतीबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तो म्हणाला, ‘ कुलदीपबद्दल अद्याप काही अपडेट नाही, काही गंभीर घडलं असतं तर आपल्याला आतापर्यंत कळलं असतं.’ अक्षरच्या म्हणण्यानुसार कुलदीपची दुखापत फार गंभीर नाही, त्यामुळे तो पुढील सामन्यातही खेळताना दिसू शकतो.
दिल्लीने सुपर ओव्हरमध्ये मारली बाजी
या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने २० षटकअखेर ५ गडी बाद १८८ धावांचा डोंगर उभारला. दिल्लीकडून अभिषेक पोरेलने सर्वाधिक ४९ धावांची खेळी केली. तर केएल राहुलने ३८ धावा केल्या. राजस्थान रॉयल्सला हा सामना जिंकण्यासाठी १८९ धावा करायच्या होत्या. राजस्थानकडून नितीश राणाने सर्वाधिक ५१ धावा चोपल्या. मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेला हा सामना बरोबरीत समाप्त झाला. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना या हंगामातील पहिली सुपर ओव्हर पाहायला मिळाली. सुपर ओव्हरमध्ये राजस्थानला ११ धावा करता आल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्सने २ चेंडू शिल्लक ठेवून हा सामना जिंकला.