आयपीएलबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. आतापर्यंत जवळपास सर्वच सामन्यांमध्ये स्टेडियम खचाखच भरले होते. हे सामने आणि त्यांचे आवडते खेळाडू पाहण्यासाठी लोक विक्रमी संख्येने स्टेडियममध्ये पोहोचत आहेत. मात्र, कधी-कधी आपल्या आवडत्या संघाला आणि खेळाडूला पाठिंबा देताना चाहत्यांमध्ये झटापटही होते. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये चाहते लाथा-बुक्क्याने हाणामारी करताना दिसत आहेत. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियम (पूर्वीचे फिरोजशाह कोटला) येथे दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान ही घटना घडली असे सांगितले जात आहे.
आयपीएल २०२३ मध्ये २९ एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला जाणारा सामना सध्या खूप चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे मिचेल मार्शची स्टार कामगिरी, हॅरी ब्रूकची क्षेत्ररक्षण, मयंक मार्कंडेयचा गोलंदाजी स्पेल आणि अभिषेक शर्माची झंझावाती फलंदाजी. पण आता या यादीत आणखी एक गोष्ट समाविष्ट झाली ती म्हणजे स्टेडियममध्ये झालेली फ्री स्टाईल हाणामारी आणि ती खेळाडूंमध्ये किंवा संघांमध्ये नाही तर चाहत्यांमध्ये. चाहत्यांमधील हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
शनिवारी राजधानीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली आणि हैदराबाद यांच्यात एक रोमांचक सामना झाला. सामन्यादरम्यान स्टेडियमच्या स्टँडवर उपस्थित प्रेक्षकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. ठोसे, लाथ, केस ओढणे… हे सगळं दिसलं. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ३-४ तरुण एकमेकांना बेदम मारहाण करत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, हा वाद कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
व्हिडिओमध्ये काही चाहत्यांच्या हातात दिल्ली कॅपिटल्सचा झेंडा दिसत होता. मारामारीदरम्यान पाच ते सहा जण एकमेकांना भिडले. ही भांडणे कशामुळे झाली हे समजू शकले नसले तरी त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नंतर काही लोकांनी येऊन हस्तक्षेप करून प्रकरण मिटवले. यावर आता दिल्ली पोलीस तपास करत आहे.
सामन्यात नेमकं काय घडलं?
सामन्याबद्दल बोलायचे तर डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सला आयपीएलच्या १६व्या हंगामात सहाव्या पराभवाला सामोरे जावे लागले. शनिवारी (२९ एप्रिल) घरच्या मैदानावर अरुण जेटली स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादने त्याला नऊ धावांनी पराभूत केले. या विजयासह हैदराबाद संघाने दिल्लीविरुद्ध सलग पाच पराभवांचा क्रम खंडित केला आहे. सनरायझर्सने २०२० मध्ये दिल्लीवर शेवटचा विजय मिळवला होता. सामन्याबद्दल बोलायचे झाले तर हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना त्यांनी २० षटकांत ६ गडी गमावून १९७ धावा केल्या. अभिषेक शर्माने ३६ चेंडूत ६७ धावा, हेनरिक क्लासेनने २७ चेंडूत ५३ धावा केल्या.
मिचेल मार्शने चार विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ २० षटकांत ६ गडी गमावून १८८ धावाच करू शकला. फिलिप सॉल्टने ३५ चेंडूत ५९ आणि मिचेल मार्शने ३९ चेंडूत ६३ धावा केल्या. कर्णधार डेव्हिड वॉर्नरला खातेही उघडता आले नाही. मार्शला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.