Deepak Chahar Sister Instagram Post: यंदाच्या आयपीएल हंगामाला सुरुवात होऊन अवघे दोन दिवसच झाले असून, इतक्याच ही स्पर्धा मैदानासह मैदानाबाहेरही रंगू लागली आहे. काल वेगवान गोलंदाज दीपक चहर आयपीएल २०२५ मध्ये मुंबई इंडियन्सकडून त्याचा पहिला सामना खेळला आणि तोही त्याचा जुना संघ चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध.
रविवारी चेपॉक येथे आयपीएलमधील कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांविरुद्ध खेळले आणि यामध्ये चेन्नईने मुंबईचा चार विकेट्सने पराभव केला. १५६ धावांचा पाठलाग करताना, चेन्नई सुपर किंग्जने कर्णधार ऋतुराज गायकवाड (५३) आणि रचिन रवींद्र (६५*) यांच्या आक्रमक खेळींच्या जोरावर पाच चेंडू शिल्लक असतानाच विजय मिळवला.
दरम्यान गेली सात वर्षे चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणाऱ्या दीपक चहरने या सामन्यात मुंबईकडून १५ चेंडूत २८ धावा आणि एक बळी मिळवत अष्टपैलू कामगिरी केली.
मालती चहरची स्टोरी
या सामन्यानंतर दीपक चहरची बहीण मालती चहरने केलेली एक इन्स्टाग्राम स्टोरी सध्या चर्चेत आली आहे. मालतीने दीपकने मुंबईकडून पदार्पण केल्यानंतर सोशल मीडियावर एक मजेदार मीम शेअर केले. मालतीने तिचा भाऊ दीपकला त्याच्या जुन्या संघाविरुद्ध खेळल्याबद्दल विनोदीपणे ट्रोल केले आणि या परिस्थितीची तुलना तेलुगू चित्रपट “बाहुबली” शी केली, ज्यामध्ये बाहुबलीच्या पाठीत कटप्पा तलवार खूपसतो असे दाखवण्यात आले आहे.
तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर मालतीने एक कोलाज पोस्ट केला आहे, ज्यामध्ये चाहरचा मैदानावरील क्षण आणि “बाहुबली” चित्रपटात कटाप्पा बाहुबलीच्या पाठीत वार करतानाचे दृश्य आहे.

मुंबईची नकोशी कामगिरी
दरम्यान कालच्या एल क्लासिको सामन्यात चेन्नईने मुंबई इंडियन्सचा पराभव करत आपलं खात उघडलं. यासह मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये सलग १३व्यांदा पहिला सामना गमावला आहे. नियमित कर्णधार हार्दिक पंड्यावर एका सामन्याची बंदी असल्यामुळे या सामन्यात मुंबई संंघाचे कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे होते.
४ गडी राखून चेन्नईचा विजय
या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यामध्ये मुंबईच्या फलंदाजांनी अपेक्षेप्रमाणे चांगली कामगिरी केली नाही, आणि त्यांनी २० षटकांत ९ गडी गमावून फक्त १५५ धावा केल्या. यानंतर मुंबईच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जने १९.१ षटकांत ४ गडी आणि ५ चेंडू राखून विजय मिळवला.