Chennai Super Kings Latest Update : चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज दीपक चहरबाबत माजी क्रिकेटर सुरेश रैनाने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. दीपक चहरला दुखापत झाल्याने तो काही सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. चहरची दुखापत तीव्र होऊ शकते, असं रैनाने म्हटलं आहे. मुंबई इंडियन्सविरोधात झालेल्या सामन्यात चहरला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला मैदानातून बाहेर जावं लागलं होतं.
सुरेश रैना चहरच्या दुखापतीवर बोलताना म्हणाला, हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळं दीपक चहर आयपीएलच्या अनेक सामन्यांमध्ये खेळण्याची शक्यता कमी आहे. रैनाने जिओ सिनेमाच्या कॉमेंट्री बॉक्समधून म्हटलं, दीपक चहर चार-पाच सामने खेळू शकणार नाही, असं वाटतंय. त्याच्या मांसपेशींमध्ये वेदना होत असल्याने तो अडचणीत असल्याचं दिसत आहे. सर्व आयपीएल वेन्यू चेन्नईपासून दूर आहेत आणि टीमला खूप प्रवास करावा लागतो. त्यामुळेच चहरसाठी परिस्थिती कठीण झाली आहे.
दीपक चहरसाठी दुखापत मोठी समस्या राहिली आहे. चेन्नई सुपर किंग्जने दीपक चहरला आयपीएल २०२२ च्या आधी झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये १४ कोटी रुपये देऊन खरेदी केलं होतं. परंतु, त्याला दुखापत झाल्याने तो पूर्ण सीजन खेळू शकला नाही. या सीजनमध्ये त्याने नक्कीच पुनरागमन केलं, पण तो यंदाच्या आयपीएल हंगामातही दुखापतग्रस्त झाला.