Sunrisers Hyderabad vs Delhi Capitals IPL Match Updates : आयपीएलच्या १६ व्या हंगामातील ३४ वा सामना सनरायझर्स हैद्राबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात हैद्राबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियममध्ये होत आहे. दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर सुरुवातीलाच दिल्ली कॅपिटल्सची खराब सुरुवात झाली. पॉवर प्ले मध्ये दिल्लीच्या दोन फलंदाजांना स्वस्तात माघारी परतावं लागलं. फिलीप सॉल्टला भुवनेश्वर कुमारने शून्यावर बाद केलं.
त्यानंतर मिचेल मार्शने सावध खेळी करत २५ धावा साकारल्या. पण मार्शही नटराजनच्या गोलंदाजीवर बाद झाला आणि दिल्लीला दुसरा धक्का बसला. त्यानंतर कर्णधार डेविड वार्नर, सर्फराज खान आणि अमन खान वॉशिंग्टन सुंदरने बाद केलं अन् दिल्लीची फलंदाजी गडगडली. पण अक्षर पटेल आणि मनिष पांडेच्या जबरदस्त भागिदारीमुळं दिल्लीने २० षटकात ९ विकेट्स गमावत १४४ धावा केल्या. त्यामुळे सनरायझर्सला २० षटकात विजयासाठी १४५ धावांचं लक्ष्य गाठावं लागणार आहे.
सनरायझर्स हैद्राबादकचा फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरने एकाच षटकात तीन फलंदाजांना बाद करून दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का दिला. सुंदरने डेविड वार्नरला २१ धावांवर असताना बाद केलं. त्यानंतर लगेच सर्फराज खान सुंदरच्या गोलंदाजीचा शिकार झाला. सर्फराझ ९ धावा करून तंबुत परतला. त्यानंतर अमन खानलाही ४ धावांवर बाद करण्यात सुंदरला यश आलं. एकाच षटकात तीन फलंदाज बाद झाल्याने दिल्लीची धावसंख्या मंदावली. अक्षर पटेलने ३४ चेंडूत ३४ धावा तर मनिष पांडेने २७ चेंडूत ३४ धावांची खेळी साकारली.
त्यानंतर अक्षर पटेल आणि मनिष पांडे यांनी सावध खेळी करत दिल्लीच्या धावसंख्येचा आलेख चढता ठेवला. सनरायझर्ससाठी वॉशिंग्टन सुंदरने ४ षटकात २८ धावा देत ३ विकेट्स घेण्याची चमकदार कामगिरी केली. भुवनेश्वर कुमारनेही तीन विकेटस् घेतल्या तर नटराजनला एका विकेटवर समाधान मानावं लागलं.