Greta Mack and Mitchell Marsh Wedding:ऑस्ट्रेलियाचा स्फोटक अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श विवाहबंधनात अडकला आहे. त्याने सोमवारी ग्रेटा मॅकशी लग्न केले. दोन वर्षांपूर्वी दोघांनी एंगेजमेंट केली होती. अलीकडेच मिचेल मार्श आयपीएल अर्धवट सोडून आपल्या देशात परतला होता. केवळ लग्न करण्यासाठी तो आपल्या देशात परतला. मात्र, आता तो लग्नानंतर काही दिवसांनी भारतात परतणार आहे. मिचेल मार्श हा आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स संघाचा एक भाग आहे.
दिल्ली कॅपिटल्सचे प्रशिक्षक जेम्स होप्स यांनी ७ एप्रिल रोजी माहिती दिली होती. होप्स म्हणाले होते की, मार्श राजस्थान रॉयल्स, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्याविरुद्धच्या तीन सामन्यांमधून बाहेर जाऊ शकतो. यापैकी दिल्लीचा संघ राजस्थानविरुद्ध सामना खेळला गेला आहे, ज्यामध्ये डीसीला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. बाकी दोन्ही संघांविरुद्ध त्यांच सामने होणे व्हायचे आहेत.
ग्रेटा कोण आहे? –
ग्रेटा ही वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठातून वाणिज्य पदवीधर आहे. यासोबतच तिने मोंटाना स्टेट युनिव्हर्सिटीमधून इंटरनॅशनल एक्स्चेंज प्रोग्राम कोर्सही केला आहे. ग्रेटा एक बिझनेस वुमन आहे आणि कौटुंबिक व्यवसाय पाहत आहे. ती ‘द फार्म मार्गारेट रिव्हर’ कंपनीची सहसंचालक आहे. बरेच दिवस एकत्र राहिल्यानंतर ११ सप्टेंबर २०२१ रोजी मिचेल मार्श आणि ग्रेटा यांची एंगेजमेंट झाली. आता दोघांचे लग्नही झाले आहे.
मिचेल मार्शची कारकीर्द –
मार्शने आतापर्यंत ऑस्ट्रेलियासाठी ३२ कसोटी, ७२ एकदिवसीय आणि ४६ कसोटी सामने खेळले आहेत. त्याने ३२ कसोटीत १२६० धावा केल्या आहेत. त्याचबरोबर ७२ एकदिवसीय सामन्यात २००८ धावा आणि ४६ टी-२० मध्ये १०८६ धावा केल्या आहेत. मार्शने कसोटीमध्ये दोन शतके आणि तीन अर्धशतके झळकावली आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये एक शतक आणि १५ अर्धशतके आणि टी-२० मध्ये सहा अर्धशतके केली आहेत. याशिवाय मार्शने कसोटीत ४२, एकदिवसीय सामन्यात ५४ आणि टी-२० मध्ये १५ विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय मार्शने ३१ आयपीएल सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ४८० धावा केल्या असून २५ विकेट्स घेतल्या आहेत.
हेही वाचा – IPL 2023: सलग ५ षटकार खाणाऱ्या यश दयालने नोंदवला लाजिरवाणा विक्रम, ‘हा’ कारनामा करणारा ठरला दुसरा गोलंदाज
दिल्ली कॅपिटल्सचा सलग तीन सामन्यात पराभव –
मार्शच्या संघ दिल्ली कॅपिटल्सची या हंगामात स्थिती चांगली नाही. या संघाने आतापर्यंत तीन सामने खेळले असून तीनही सामने गमावले आहेत. पहिल्या सामन्यात लखनऊने दिल्लीचा ५० धावांनी पराभव केला. मार्शला त्या सामन्यात खातेही उघडता आले नव्हते. यानंतर दुसऱ्या सामन्यात गुजरातने दिल्लीचा सहा गडी राखून पराभव केला. या सामन्यात मार्शने चार धावा केल्या. राजस्थानविरुद्धचा तिसरा सामना मार्श खेळला नाही. या सामन्यात राजस्थानने दिल्लीचा ५७ धावांनी पराभव केला. आता ११ एप्रिलला दिल्लीचा सामना मुंबई इंडियन्सशी होणार आहे.