Delhi Capitals Shared Parth Jindal Video : आयपीएल २०२४ मध्ये एक सामना खेळला गेला, ज्याची चर्चा अजूनही सुरू आहे. विशेषतः राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन तसेच दिल्ली कॅपिटल्सचे अध्यक्ष आणि सहमालक पार्थ जिंदाल हे चर्चेत आहेत. पार्थ जिंदाल हे दिल्ली कॅपिटल्स संघाच्या मालकांपैकी एक असले तरी त्यांचा संजूशी थेट संबंध नाही, मात्र मंगळवारी सामना पाहणाऱ्यांना हे प्रकरण काय आहे ते समजले असेल. दरम्यान, आता दिल्ली कॅपिटल्सच्या अधिकृत एक्स हँडलवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये पार्थ जिंदाल आणि संजू सॅमसन एकमेकांशी संवाद साधताना दिसले.
दिल्ली विरुद्ध राजस्थान सामन्यात काय घडले?
वास्तविक, मंगळवारी दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना झाला, जो दिल्लीने २० धावांनी जिंकला. पण याआधी एक वेळ अशी आली जेव्हा संजू सॅमसनला बाद करण्यावरून वाद निर्माण झाला होता. राजस्थान संघ फलंदाजी करत असताना डावाच्या १६व्या षटकातील चौथ्या चेंडूवर मुकेश कुमारने संजू सॅमसनला शाई होपकरवी झेलबाद केले. शाई होपने हा झेल सीमारेषेच्या अगदी जवळ घेतला. रिप्ले पाहून तिसऱ्या पंचाने त्याला आऊट दिले. होपचा पाय सीमारेषेला लागला असे काही लोकांचे मत होते. त्यामुळे षटकार देऊन नॉटआउट घोषित करायला हवे होते, असे म्हणने होते.
संजू सॅमसनची अंपायरला रिप्ले पुन्हा पाहण्याची विनंती –
रिप्ले पाहिल्यानंतर संजू सॅमसनने स्वतः परत जाऊन अंपायरशी चर्चा केली आणि पुन्हा एकदा रिप्ले पाहण्याची विनंती केली. दरम्यान, हे सर्व सुरू असताना दिल्ली कॅपिटल्सचे चेअरमन आणि सहमालक पार्थ जिंदाल सातत्याने ओरडताना दिसले. व्हिडीओमध्ये आवाज नसला तरी ते सतत एकच ‘आऊट आहे, आऊट आहे’ म्हणत असल्याचे बोलले जात आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
हेही वाचा – DC vs RR : संजू सॅमसनने धोनीचा विक्रम मोडत रचला इतिहास, आयपीएलमध्ये केला ‘हा’ खास पराक्रम
दिल्ली कॅपिटल्सने शेअर केला नवीन व्हिडीओ –
पार्थ जिंदालच्या अशोभनीय वर्तनानंतर त्याचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे काही वेळातच पार्थ जिंदाल एक्सवर टॉपवर ट्रेंड करू लागला. हाच क्रम मंगळवारी रात्रीनंतर बुधवारीही कायम राहिला. लोक उत्साहाने पार्थ जिंदालच्या वर्तनावर आपली प्रतिक्रिया देत होते. दरम्यान, काही वेळापूर्वी दिल्ली कॅपिटल्सच्या एक्स हँडलवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो मंगळवारच्या सामन्यानंतरचा आहे.
या व्हिडीओ मध्ये संजू सॅमसन, पार्थ जिंदाल आणि राजस्थान रॉयल्सचे मालक मनोज बदाले एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. ज्यामध्ये दिसत आहे की पार्थ जिंदालने सामन्यानंतर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन आणि संघाचे मालक मनोज बदाले यांची भेट घेतली. यादरम्यान संजू सॅमसन आणि मनोज बदाले यांच्याशी हस्तांदोलन केले.
हेही वाचा – IPL 2024: संजू सॅमसन Out की Not Out? इरफान पठाण-नवज्योत सिंग सिद्धू यांंचंं काय आहे म्हणणं…
पार्थ जिंदाल सोशल मीडियावर चर्चेत –
विशेष बाब म्हणजे हा व्हिडीओ दिल्ली कॅपिटल्सने शेअर करताच लोकांनी त्यावर कमेंट करायला सुरुवात केली, ज्यामध्ये पार्थ जिंदाल हे लक्ष्य होते. यानंतर सर्व कमेंट डिलीट झाल्या आणि कमेंट ऑप्शनही बंद करावा लागला. लोकांनी सांगितले की अंपायरने आधीच निर्णय दिला होता. त्यानंतर संजू फक्त त्याचे मत मांडण्यासाठी अंपायरकडे गेला होता. दिल्ली कॅपिटल्स संघाचा मालक असतातान पार्थ जिंदालने केलेले वर्तन अशोभनीय होते. तसेच संजू सॅमसनने अंपायरच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केल्यानंतर त्याच्या मॅच फीच्या ३० टक्के रक्कमही कापण्यात आली आहे.