Delhi Capitals won by 10 runs against Mumbai Indians : आयपीएलच्या १७व्या हंगामातील ४३ वा सामना अरुण जेटली स्टेडियम दिल्ली येथे पार पडला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि पाच वेळची चॅम्पियन मुंबई इंडियन्स आमनेसामने होते. ज्यामध्ये दिल्लीने मुंबईवर १० धावांनी मात करत यंदाच्या हंगामातील पाचवा विजय मिळवला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने जेक फ्रेझर मॅकगर्कच्या वादळी खेळीच्या जोरावर मुंबईसमोर २५८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, प्रत्युत्तरात मुंबईचा संघ तिलक वर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर २४७ धावाच करु शकला.
तिलक वर्माची वादळी खेळी ठरली व्यर्थ –
दिल्ली कॅपिटल्सने दिलेल्या २५८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना तिलक वर्माने सर्वाधिक धावांचे योगदान दिले. त्याने ३२ चेंडूचा सामना करताना ४ चौकार आणि ४ षटकार मारत सर्वाधिक ६३ धावा केल्या. हार्दिक पांड्याने २४ चेंडूत ४६ धावांची तुफानी खेळी केली. मुंबई इंडियन्सच्या कर्णधाराने आपल्या खेळीत ४ चौकार आणि ३ षटकार मारले. याशिवाय टीम डेव्हिडने १७ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ३७ धावा केल्या.
इशान किशन १४ चेंडूत २० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तर रोहित शर्माने ८ चेंडूत ८ धावा केल्यानंतर बाद झाला. सूर्यकुमार यादव १३ चेंडूत २६ धावा करून सूर्यकुमार यादव बाद झाला. दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे झाल्यास, मुकेश कुमार आणि रसिख दार सलाम हे सर्वात यशस्वी गोलंदाज होते. मुकेश कुमार आणि रसिक दार सलाम यांनी मुंबई इंडियन्सच्या ३-३ फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. याशिवाय खलील अहमदने २ विकेट्स घेतल्या.
जेक फ्रेझर मॅकगर्कने १५ चेंडूत ठोकले अर्धशतक –
तत्पूर्वी नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात दमदार झाली. जेक फ्रेझर मॅकगर्कने डावाच्या सुरुवातीला चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली. त्याने पोरेलसोबत पहिल्या विकेटसाठी ११४ धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाने २७ चेंडूत ८४ धावांची तुफानी खेळी केली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ११ चौकार आणि ६ षटकार आले. त्याचवेळी त्याचा स्ट्राईक रेट ३११.१ होता. याशिवाय पोरेलने ३६ धावा केल्या.
हेही वाचा – DC vs MI : दिल्लीच्या फलंदाजांनी धुलाई केल्यानंतर हार्दिक पंड्या अंपायरवर संतापला, काय होत कारण?
तिसऱ्या विकेटसाठी शाई होप आणि ऋषभ पंत यांच्यात ५३ धावांची भागीदारी झाली, जी वुडने मोडली. होप १७ चेंडूत ४१ धावा करू शकला. त्याच वेळी, कर्णधाराने दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने २९ धावा काढल्या. पंत आणि स्टब्समध्ये ५५ धावांची भागीदारी झाली. स्टब्स २५ चेंडूत ४८ धावा करून नाबाद राहिला. तर अक्षर पटेलने ११ धावांची नाबाद खेळी केली. अशा प्रकारे दिल्लीने मुंबईविरुद्ध २० षटकांत ४ गडी गमावून २५७ धावा केल्या होत्या. आयपीएलच्या इतिहासात दिल्लीने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. या सामन्यात मुंबईसाठी वुड, बुमराह, पियुष चावला आणि मोहम्मद नबी यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.