लागोपाठ अपयशास सामोरे जावे लागणाऱ्या दिल्ली डेअर डेव्हिल्स व पुणे वॉरियर्स या दोन्ही दुबळ्या संघांमध्ये रविवारी येथे आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा सामना होत आहे. या सामन्यात दिल्लीचे पारडे जड राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हा सामना येथे नव्याने बांधण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होत असल्यामुळे या सामन्याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. आयपीएलमधील दोन सामने येथे आयोजित केले जात असून त्याद्वारे येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांची चाचणी घेतली जाणार आहे.
दिल्ली संघात अनेक नामवंत खेळांडूचा समावेश असला, तरी ‘नाव मोठे आणि लक्षण खोटे’ अशी त्यांची सध्या अवस्था झाली आहे. आतापर्यंत झालेल्या आठ सामन्यांमध्ये दिल्लीने सात सामने गमावले असून साखळी गटात ते सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहेत. पुण्याने आठ सामन्यांमध्ये सहा सामने गमावले आहेत. त्यामुळेच या दोन्ही दुबळ्या संघांना अपयशातून थोडेसे डोके वर काढण्याची संधी येथे मिळत आहे. उर्वरित सामन्यांकरिता आत्मविश्वास मिळविण्यासाठी दोन्ही संघ येथे विजय मिळविण्याचा कसोशीने प्रयत्न करतील अशी आशा आहे.
केविन पीटरसन व जेसी रायडर या दोन्ही जखमी खेळाडूंच्या अनुपस्थितीत यंदा दिल्लीस खेळावे लागत आहे. त्यांच्या अनुपस्थितीत दिल्लीस सर्वच आघाडय़ांवर निराशाजनक कामगिरीस सामोरे जावे लागले आहे.
पुण्यास सुरुवातीला फलंदाजीबाबत समस्या जाणवत होती. ही समस्या दूर झाली तर आता त्यांना गोलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे अडचणीच टाकले आहे. ख्रिस गेल याने पुण्याविरुद्धच्या सामन्यात नाबाद १७५ धावांची किमया केली होती. त्या पाश्र्वभूमीवर दिल्लीस दुसरा विजय मिळविण्याची संधी आहे. त्यांचे वीरेंद्र सेहवाग व डेव्हिड वॉर्नर हे आक्रमक फलंदाज गेलचा कित्ता थोडय़ा प्रमाणात गाजवतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सामन्याची वेळ : रात्री ८ वा.पासून

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा