वीरू आणि जयचे ‘शोले’ पाहण्याचे भाग्य रविवारी फिरोझशाह कोटला स्टेडियमवर दिल्लीकरांना लाभले. आयपीएलच्या सहाव्या पर्वात सलग सहा पराभव गाठीशी घेऊन खेळणाऱ्या दिल्ली डेअरडेव्हिल्सने कमाल केली. सचिन तेंडुलकर, रिकी पाँटिंग आणि लसिथ मलिंगासारख्या जागतिक क्रिकेटमधील रथी-महारथींचा भरणा असलेल्या मुंबई इंडियन्सचाच पराभव करण्याची किमया साधली. या विजयामुळे आत्मविश्वास दुणावलेला दिल्लीचा संघ मंगळवारी किंग्ज ईलेव्हन पंजाबशी झुंजणार आहे.
यंदाच्या आयपीएल पर्वात पराभवांचा ससेमिरा दिल्ली डेअरडेव्हिल्स पिच्छा पुरवत होता. परंतु रविवारी वीरेंद्र सेहवाग मुंबईच्या गोलंदाजांवर बरसला. त्याने नाबाद ९५ धावांची झंझावाती खेळी साकारली. त्यामुळेच दिल्लीला मुंबई इंडियन्सवर नऊ विकेट राखून दिमाखदार विजयाची नोंद करता आली. परंतु तरीही सध्या दिल्लीचा संघ आयपीएलच्या गुणतालिकेत तळाला आहे. त्यामुळे आयपीएलच्या बाद फेरीत खेळण्यासाठी दिल्लीला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. उर्वरित नऊ सामन्यांपैकी किमान आठ सामने जिंकल्यास दिल्लीला बाद फेरीच्या आशा धरता येतील.
वेस्ट इंडिजचा महान स्फोटक फलंदाज विवियन रिचर्ड्स दिल्ली संघाचा सल्लागार म्हणून कार्यरत झाल्यानंतर एका दिवसात दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या कामगिरीत आक्रमकता दिसून आली. सेहवागला सूर गवसला, हा रिचर्ड्सचाच महिमा असे म्हटले जात आहे. वीरूने आपला हाच आवेश जोपासल्यास दिल्लीची विजयी कामगिरी कायम राहील, याची क्रिकेटरसिकांना पूर्ण जाणीव आहे.
दिल्लीच्या अपयशाचे प्रमुख कारण म्हणजे त्यांची फलंदाजीची फळी मैदानावर सिद्ध होऊ शकली नव्हती. डेव्हिड वॉर्नर आणि कप्तान महेला जयवर्धने यांनी अर्धशतके झळकावली होती. पण सेहवाग धावांसाठी झगडत होता. रविवारी त्याला सूर गवसला आणि दिल्लीच्या विजयाचा झेंडा डौलाने फडकला. मनप्रीत जुनेजा आणि केदार जाधव यांच्याकडूनही अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. पहिल्या तीन सामन्यांत अपयशी ठरलेला उन्मुक्त चंद पुन्हा मैदानावर परतेल, अशी आशा आहे.
उमेश यादवने आपली किफायतशीरता प्रकट करताना ७ सामन्यांत ९ बळी घेतले आहेत, तर आशीष नेहराने ४ सामन्यांत ६ बळी मिळवले आहेत. अष्टपैलू इरफान पठाण फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागांत अपयशी ठरला आहे. त्याला ७ सामन्यांत फक्त ३ बळी मिळाले आहेत.
दुसरीकडे किंग्ज ईलेव्हन पंजाबचा संघ अनिश्चिततेसाठी विशेष ओळखला जातो. रविवारी रात्री पंजाबने पुणे वॉरियर्सचा सात विकेट राखून पराभव केला. त्यामुळे त्यांचा आलेख उंचावला आहे. पंजाबच्या खात्यावर सहा सामन्यांतील तीन विजयांनिशी ६ गुण जमा आहेत.
कप्तान अॅडम गिलख्रिस्टची फलंदाजी हा पंजाबचा प्रमुख चिंतेचा विषय आहे. गिलख्रिस्टला आतापर्यंतच्या सहा डावांत अनुक्रमे १५, ९, ०, ७, २६ आणि ४ धावा काढता आल्या आहेत. त्यामुळे युवा मनदीप सिंग आणि अनुभवी डेव्हिड हसी पंजाबच्या फलंदाजीची धुरा वाहत आहेत.
डेव्हिड मिलरने रविवारी पुण्याविरुद्ध ४१ चेंडूंत ८० धावांची दमदार खेळी साकारली होती. त्याने मनदीपसोबत १२८ धावांची नाबाद भागीदारीसुद्धा उभारली. त्यामुळे या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अनुक्रमे ८ आणि ७ बळी घेणाऱ्या अझर मेहमूद आणि प्रवीण कुमार यांच्यावर पंजाबच्या वेगवान माऱ्याची मदार असेल.
सामन्याची वेळ : रात्री ८ वा.पासून
रवींद्र जडेजा, चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू
जगभरात सर्वाना रविवारची सुट्टी का असते, कारण त्यामध्ये रवी आहे, रवींद्र जडेजाचा आरामाचा दिवस.
दिल्लीकरांना उत्सुकता.. ‘शोले-२’ची
वीरू आणि जयचे ‘शोले’ पाहण्याचे भाग्य रविवारी फिरोझशाह कोटला स्टेडियमवर दिल्लीकरांना लाभले. आयपीएलच्या सहाव्या पर्वात सलग सहा पराभव गाठीशी घेऊन खेळणाऱ्या दिल्ली डेअरडेव्हिल्सने कमाल केली.
First published on: 23-04-2013 at 03:47 IST
मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi daredevils will fight with kings elevan punjab