आतापर्यंतच्या दोन्ही सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सच्या पदरी पराभवच पडला असून त्यांची गाडी अजूनही रुळावर आलेली नाही. त्यामुळे मुंबईचा कर्णधार आणि संघ अजूनही विजयाच्या प्रतीक्षेतच आहेत. मुंबईचा तिसरा सामना राजस्थान रॉयल्सशी होणार असून स्पर्धेतील पहिला विजय मिळवण्यासाठी ते प्रयत्नशील असतील. दुसरीकडे राजस्थान रॉयल्सची कामगिरी चांगली होत असून दोन्ही सामन्यांमध्ये त्यांनी विजय मिळवलेले आहेत. त्यामुळे विजयाची हॅट्ट्रिक साजरी करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
मुंबईची फलंदाजी अजूनही दमदार होताना दिसत नाही. किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात तर त्यांनी ५९ धावांमध्ये सहा फलंदाज गमावले होते. त्यानंतर हरभजन सिंग खेळल्यामुळे मुंबईला दीडशे धावांचा पल् ला गाठता आला. रोहितला कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. किरॉन पोलार्ड, अॅरोन फिंच, कोरे अँडरसन, अंबाती रायुडू, आदित्य तरे यांना अजूनही सूर गवसलेला दिसत नाही. गोलंदाजीमध्ये आर. विनयकुमार महागडा ठरताना दिसत आहे. हरभजन सिंग आणि लसिथ मलिंगा यांचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाला छाप पाडता आलेली नाही. मुंबई इंडियन्सच्या संघात बरेच नावलौकिक मिळालेले खेळाडू असले तरी त्यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.
राजस्थान रॉयल्सचा विचार केल्यास स्टीव्हन स्मिथसारखा युवा आणि तडफदार कर्णधार त्यांना मिळालेला आहे. अजिंक्य रहाणे चांगल्या फॉर्मात आहे. गेल्या सामन्यात दीपक हुडाने दमदार फलंदाजी केली होती, पण ड्वेन स्मिथ आणि जेम्स फॉकनर या आंतरराष्ट्रीय स्तरावरचा चांगला अनुभव असलेल्या खेळाडूंना अजूनही लय सापडलेली नाही. संघात वाजतगाजत आलेल्या ख्रिस मॉरिसला अजूनही छाप पाडता आलेली नाही. गेल्या सामन्यात त्यांना अखेरच्या चेंडूवर विजय मिळवता आला होता. त्यांच्या विजयातील अंतर कमी होताना दिसत आहे.
प्रतिस्पर्धी संघ
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), कोरे अँडरसन, एडन ब्लिझार्ड, जसप्रीत बुमराह, उन्मुक्त चंद, र्मचट डि लॉन्ज, आरोन फिंच, श्रेयस गोपाळ, हरभजन सिंग, जोश हेझलवूड, सिद्धेश लाड, मिचेल मॅक्लेघान, लसिथ मलिंगा, अभिमन्यू मिथुन, प्रग्यान ओझा, हार्दिक पंडय़ा, पार्थिव पटेल, कीरेन पोलार्ड, नितीश राणा, अंबाती रायुडू, लेंडल सिमन्स, जगदीश सुचित, पवन सुन्याल, आदित्य तरे, विनय कुमार, अक्षय वाखरे.
राजस्थान रॉयल्स : शेन वॉटसन , अंकित शर्मा, ब्रेनडर स्रान, रजत भाटिया, स्टुअर्ट बिन्नी, बेन कटिंग, जेम्स फॉकनर, दीपक हुडा, धवल कुलकर्णी, विक्रमजीत मलिक, ख्रिस मॉरिस, करुण नायर, अभिषेक नायर, अजिंक्य रहाणे, प्रदीप साहू, दिनेश साळुंखे, संजू सॅमसन, स्टीव्हन स्मिथ, टिम साऊदी, प्रवीण तांबे, राहुल टेवाटिया, रस्टी थेरॉन, सागर त्रिवेदी, दिशांत याग्निक.