संघसहकारी ड्वेन स्मिथला चुकीच्या पद्धतीने बाद दिल्याप्रकरणी चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाराजी प्रकट केली होती. मात्र आयपीएलच्या खेळाडूंसाठीच्या आचारसंहितेनुसार हा २.१.७ कलमाचा भंग असल्याने धोनीला दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. धोनीच्या सामन्याच्या मानधनातून १० टक्के रक्कम कापून घेण्यात येणार आहे.
१८८ धावांच्या प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सचा गोलंदाज लसिथ मलिंगाने पहिल्याच षटकात ड्वेन स्मिथला पायचीत केले. मात्र मलिंगाचा फुलटॉस चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर जात असल्याचे रिप्लेत स्पष्ट दिसत होते. चेंडू स्मिथच्या शरीरावर आदळला, तेव्हा तो डाव्या यष्टीच्या बाहेर अंतर सोडून उभा होता. मात्र तरीही पंच रे इलिंगवर्थ यांनी त्याला बाद दिले. मोठय़ा लक्ष्याचा पाठलाग करताना धडाकेबाज फलंदाज स्मिथला पहिल्याच षटकात गमावल्याने चेन्नईचे आव्हान कमकुवत झाले. चेन्नईने हा सामना २५ धावांनी गमावला.
सामना संपल्यानंतर बोलताना धोनीने संघ कमी पडल्याची कबुली दिली. मात्र त्याच वेळी स्मिथ पंचांच्या भयंकर निर्णयाचा बळी ठरल्याचे विधान धोनीने केले. सामनाधिकाऱ्यांसमोर झालेल्या सुनावणीत धोनीने आपली चूक कबूल केली. उद्गार आक्षेपार्ह असल्याने सामनाधिकाऱ्यांनी त्याला दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा