रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर शेवटच्या चेंडूवर थरारक विजय मिळवल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची स्वारी भलतीच खूश होती. रवींद्र जडेजाला ‘सर’ अशी उपाधी देत धोनीने धमाल उडवून दिली आहे.
‘‘एक चेंडूत दोन धावांची आवश्यकता असेल आणि ‘सर’ जडेजा मैदानात असेल तर तो एक चेंडू राखूनच विजय मिळवून देईल,’’ असे धोनीने ‘ट्विटर’वर म्हटले. धोनीने आपल्या सहकाऱ्यांसह चाहत्यांना ‘ट्विटर’द्वारे हास्यमेजवानी दिली. तो म्हणतो, ‘‘एका दौऱ्यात एकच ट्वेन्टी-२० सामना खेळावा लागत असल्याने ‘सर’ जडेजा निराश असायचा. अखेर बीसीसीआयला आयपीएलची कल्पना सुचली. त्यामुळे चाहत्यांनी ‘सर’ जडेजाचे आभार मानायला हवेत. दक्षिणेतील अभिनेते रजनीकांत म्हातारे झाल्यामुळे देवाने ‘सर’ रवींद्र जडेजाची निर्मिती केली.’’
काही दिवसांपूर्वी धोनी म्हणाला की, ‘‘सर जडेजा जीप चालवत असताना जीप जागच्या जागीच राहते, रस्ता पळू लागतो. तो मैदानावर बॅटिंगला जातो, तेव्हा पॅव्हेलियनच खेळपट्टीकडे जाऊ लागते. ‘सर’ जडेजा झेलसाठी कधीच धावत नाही, चेंडू थेट त्याच्या हातात पडत असतो. ‘सर’ जडेजा कधी चुका करतात, त्यावेळी त्यातून नवीन आविष्कार घडत असतो. दर दिवशी आम्हाला त्याची अनुभूती येत आहे.’’
माझ्यासाठीची ‘सर’ उपाधी हास्यास्पद -जडेजा
चेन्नई : चेन्नई सुपर किंग्ज आणि भारतीय संघातील सहकाऱ्यांनी माझ्या नावापुढे कोणतेही विशेषण जोडल्यामुळे मला कोणताही त्रास होणार नाही. पण महेंद्रसिंग धोनीने मला दिलेली ‘सर’ ही उपाधी हास्यास्पद वाटते, असे रवींद्र जडेजाने स्पष्ट केले. ‘‘ड्रेसिंगरूममध्ये आम्ही प्रत्येकाची चेष्टामस्करी करत असतो. त्यामुळे वातावरणही हलकेफुलके राहते. अशाच वातावरणात ‘सर’ ही मिळालेली उपाधी हास्यास्पद वाटते. कुणीही गंभीरतेने घेऊ नये. मला ‘सर’ संबोधल्याने कुणाच्या चेहऱ्यावर आनंद झळकत असेल, तर त्याचे मलाही समाधान वाटते,’’ असे जडेजाने सांगितले. बंगळुरूविरुद्धच्या विजयी कामगिरीबद्दल तो म्हणाला, ‘‘चांगली खेळी करून धोनी बाद झाल्यानंतर अखेरच्या षटकांत आम्हाला १६ धावांची आवश्यकता होती. त्यामुळे ड्वेन ब्राव्हो आणि ख्रिस मॉरिससह मी आक्रमक खेळी करून चेन्नईला विजय मिळवून दिला.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा