IPL 2025: लखनौ सुपर जायंट्सने शुक्रवारी मुंबई इंडियन्सला नमवत १८ व्या हंगामातील दुसरा विजय साकारला. अवघ्या १२ धावांनी लखनौचा विजय झाला. मात्र या सामन्यात लखनौचा फिरकीपटू दिग्वेश राठीला पुन्हा एकदा दंड बसला आहे. विकेट घेतल्यावर हातावर लिहिण्याची कृती करून फलंदाजांची पावती फाडणाऱ्या दिग्वेशची पावती आयपीएलकडून फाडण्यात आली आहे. सामन्याच्या मानधनातील ५० टक्के रक्कम वजा केली जाणार आहे. याच आठवड्यात पंजाबविरुद्ध खेळताना दिग्वेशने प्रियांश आर्याला बाद केल्यानंतर त्याला खेटून चालत पावती फाडण्याची कृती केली होती. तेव्हाही आयपीएलने त्याच्या मानधनातील २५ टक्के रक्कम वजा केली होती.

दिग्वेश राठीसह ऋषभ पंतलाही दंड भरावा लागणार आहे. षटकांची गती संथ केल्यामुळे ऋषभला १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ऋषभ पंतला १४ व्या षटकावेळीच खेळ संथ गतीने जात असल्याबाबत ताकीद देण्यात आली होती. त्यानंतर ऋषभ दोन षटकांच्या दरम्यान पळापळ करताना दिसून आला. मात्र तरीही षटक संथ गतीने टाकले गेल्याने त्याला दंड ठोठावला गेला आहे.

शनिवारी आयपीएलने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले की, दिग्वेश राठीने या हंगामात कलम २.५ अंतर्गत हा दुसरा स्तर १ चा गुन्हा केला आहे. १ एप्रिल रोजी पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात त्याने अशीच कृती केली होती. तेव्हा त्याचे २५ टक्के मानधन कापण्यात आले होते. यावेळी त्याचे ५० टक्के मानधन कापले गेले आहे.

स्तर १ च्या गुन्ह्यासाठी सामन्याच्या रेफरीचा निर्णय अंतिम मानला जातो. जो सर्वांना मान्य करावा लागतो.

आयपीएलच्या कलम २.५ मध्ये खेळाडूंच्या वर्तनासंबंधीचे भाष्य केलेले आहे. अपमानास्पद टिप्पणी, चिथावणीखोर प्रतिक्रिया, आक्षेपार्ह कृती किंवा हावभाव करणे यास प्रतिबंधित करण्यात आले आहे. तथापि, या संहितेमध्ये असेही स्पष्ट करण्यात आले आहे की, विरुद्ध संघाच्या फलंदाजाला बाद केल्यानंतर गोलंदाजांना आनंद साजरा करण्यापासून रोखण्याचा या कलमाचा उद्देश नाही. मात्र खेळाडूंनी शिस्तीत राहून आनंद व्यक्त केला पाहिजे.

ऋषभ पंतला दंड का?

आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.२ अंतर्गत संथ षटकांची गती गुन्ह्यास पात्र आहे. ऋषभ पंतचा या हंगामातील हा पहिला गुन्हा आहे. त्याला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

संथ गतीने षटक टाकल्यामुळे ऋषभ पंतसह संपूर्ण संघाला सामन्यादरम्यान दंड बसला होता. शेवटच्या षटकात मुंबई इंडियन्सला २२ धावा हव्या असताना लखनौला आतल्या रिंगाबाहेर केवळ ४ खेळाडू ठेवण्याची अनुमती दिली गेली. मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी जर मोठे फटके खेळले असते तर लखनौला कदाचित हा सामना गमवावा लागू शकला असता. पण असे असतानाही त्यांनी सामन्यात विजय मिळविला.