अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियवर बुधवारी राजस्थानच्या रोव्हमन पॉवेलने षटकार लगावला आणि स्टंप्सपाठी एका पर्वाचा शेवट झाला. घामाने डबडबलेल्या दिनेश कार्तिकने खिन्न मनाने पराभव स्वीकारला. त्याने डोक्यातून टोपी काढली. त्याची आयुधं अर्थात ग्लोव्ह्ज काढले. तोवर बंगळुरूच्या प्रत्येक खेळाडूने कार्तिकच्या दिशेने धाव घेतली. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने त्याला घट्ट मिठी मारली. बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लसीनेही तेच केलं. राजस्थानच्या सगळ्या खेळाडूंनीही त्याला अभिवादन केलं. मैदानातही ‘मिस यू डीके’ फलक झळकत होते. डोळ्यांच्या कडा पाणावलेल्या कार्तिकने चाहत्यांना वंदन केलं आणि तो पॅव्हेलियनमध्ये परतला आणि दोन दशकांच्या संघर्षमयी मैफलीची भैरवी झाली.

दिनेश कार्तिक फक्त माणूस नाहीये, डीके म्हणजे निराशेला वाकुल्या दाखवत उमलणारा आशेचा किरण आहे. डीके म्हणजे चैतन्यमयी सळसळ आहे. तिशी ओलांडली की दोन मजले चढल्यावर धाप लागणाऱ्या मंडळींसाठी डीके अंजन आहे. प्रसंगानुरुप विविधरंगी टायसह सुटाबुटात वावरणारा डीके म्हणजे स्टाईल आयकॉन आहे. दाक्षिणात्य लहेजात हिंदी बोलणारा डीके खऱ्या अर्थाने उत्तर-दक्षिणेला सांधणारा मिलाफ आहे.

Venkatesh Iyer Completed His MBA and Now Pursuing PhD in Finance
IPL 2025: आयपीएल लिलावात २३ कोटींपेक्षा जास्त बोली अन् आता होणार डॉक्टर, कोण आहे हा खेळाडू?
Ajinkya Rahane likely to lead KKR in IPL 2025
IPL 2025 : व्यंकटेश अय्यर नव्हे तर ‘हा’…
IPL Auction 2025 Sold and Unsold Players List in Marathi
IPL Auction 2025 Sold and Unsold Players List: आयपीएल लिलावातील सोल्ड-अनसोल्ड खेळाडूंची यादी वाचा एकाच क्लिकवर
RCB Hindi Social Media Post and New Account Erupted Controversy Among Fans After IPL 2025 Mega Auction
RCB Hindi Post: RCB वर चाहते भडकले, हिंदी सोशल मीडिया अकाऊंट सुरू केल्याने चाहत्यांचा रोष; नेमकं काय घडलं?
Lalit Modi accuses N Srinivasan of umpire fixing in Chennai Super Kings matches
IPL: ललित मोदींनी चेन्नई संघमालक श्रीनिवासन यांच्यावर फिक्सिंगचे केले आरोप; म्हणाले, “CSK च्या सामन्यांसाठी अंपायर बदलायचे अन् लिलावात…”
Prithvi Shaw Statement on Trolls After Going Unsold at IPL Auction Video Goes Viral
Prithi Shaw IPL Auction: पृथ्वी शॉने IPL लिलावात अनसोल्ड राहिल्यानंतर केलं मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘ट्रोलिंगच्या पोस्ट मी पाहतो पण…’
Why Rishabh Pant Left Delhi Capitals Franchise Delhi Capitals Co Owner Parth Jindal Reveals After IPL 2025 Auction
Rishabh Pant: ऋषभ पंतने पैसे नाही तर ‘या’ कारणामुळे दिल्लीची सोडली साथ, संघमालक पार्थ जिंदाल यांनी केला मोठा खुलासा
IPL 2025 Mega Auction Veteran players remained unsold list
IPL 2025 Unsold Players List : डेव्हिड वॉर्नर, केन विल्यम्सन आणि शार्दुल ठाकुरसारखे दिग्गज खेळाडू राहिले अनसोल्ड, पाहा यादी
Vaibhav Suryavanshi's coach rejects age fraud rumours after historic IPL 2025 Mega Auction deal
Vaibhav Suryavanshi IPL 2025 : BCCI ने वैभव सूर्यवंशीच्या हाडांची केली होती चाचणी? लिलावात राजस्थानने १.१ कोटी रुपयांच्या बोलीसह केलं खरेदी

दिनेश कार्तिक हे नाव उच्चारलं की मन वीस वर्ष मागे जातं. भारत आणि इंग्लंड यांच्यात क्रिकेटची पंढरी लॉर्ड्स इथे मुकाबला सुरू होता. ५ सप्टेंबर २००४. इंग्लंडला २०५ धावांचंच लक्ष्य होतं. इंग्लंडने नियमित अंतरात विकेट्स गमावल्या. मायकेन वॉन मात्र अर्धशतकासह झुंज देत होता. हरभजनच्या फिरकीसमोर पदलालित्य दाखवण्याची वॉनला हुक्की आली. चेंडू टप्पा पडून वळला. लेगस्टंपच्या अनेक घरं बाहेर गेला. त्या चेंडूने वॉनचा चकवा दिला तसं स्टंप्सच्या मागे उभ्या असलेल्या कार्तिकलाही. पण तरण्याबांड कार्तिकने डावीकडे उंचीवर तो चेंडू टिपला आणि डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोपर्यंत सूर मारुन बेल्स उडवल्या. कार्तिकच्या चापल्यामुळे वॉनला क्रीझमध्ये परतायची संधीच मिळाली नाही. वॉन तंबूच्या दिशेने जातोय आणि दुसरीकडे कार्तिकने हवेत उंच उडी मारुन केलेलं सेलिब्रेशन चिरंतन स्मरणात राहील. भारतीय विकेटकीपरने केलेलं ते काही पहिलंवहिलं स्टंपिंग नव्हतं पण ती ऊर्जा, तो उत्साह आणि प्रतिस्पर्धी फलंदाजाला बाद करण्याची ऊर्मी हे खास होतं.

दिनेश कार्तिक कालातीत आहे. तो द्रविड-गांगुली काळात आला. तो कुंबळे काळातही होता. तो धोनी काळात येऊनजाऊन होता. कोहली काळातही त्याचा वावर होता. रोहित शर्मा पर्वातही तो होता. आता हार्दिक-गिल काळातही तो आहे. ‘आनंद मरते नही’ तसं कार्तिक संपत नाही. तो नव्या जोमाने येत राहतो. ‘मी पुन्हा येईन’ अशा दर्पोक्त्याही त्याला कराव्या लागत नाहीत. त्याची बॅट बोलते. त्याचे ग्लोव्ह्ज बोलतात. प्रत्येक पिढीला आपली पिढी भारी आणि पुढच्या पिढ्या सपक वाटतात. तसंच जेन झी जनरेशनला ९०चे ओल्ड स्कूलवाले आवडत नाहीत. पिढीगणिक संदर्भ बदलतात, मानकं बदलतात. कालचक्र फिरत राहतं, कार्तिक स्वत:च एक कालचक्र आहे. चेंज इज द ऑन्ली कॉन्स्टंट थिंग असं इंग्रजीत म्हणतात. कार्तिकने कालानुरुप खेळात बदल केले पण त्याचं स्वत्व गमावलं नाही. घरी मोठं कार्य काढलं की काही माणसं लागतात. त्यांचा अनुभव आणि त्यांचं असणं आवश्यक असतं. कार्तिक तसा होता.

भारताने पहिला ट्वेन्टी२० सामना २००६ साली खेळला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोहान्सबर्ग इथे हा सामना झाला. आयपीएलचा तेव्हा मागमूसही नव्हता. ट्वेन्टी२० प्रकारही बाल्यावस्थेत होता. सचिन, सेहवाग, धोनी, रैना अशी तगडी फलंदाजी असलेल्या त्या सामन्यात कार्तिक सामनावीर होता. कार्तिकने त्या सामन्यात २८ चेंडूत नाबाद ३१ धावांची खेळी साकारली होती. पुढच्याच वर्षी म्हणजे २००७ मध्ये झालेल्या पहिल्यावहिल्या ट्वेन्टी२० वर्ल्डकप स्पर्धेत कार्तिक भारतीय संघाचा भाग होता. चार वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये झालेल्या ५० षटकांच्या वर्ल्डकपमध्ये कार्तिक भारतीय संघाचा भाग होता. टेस्ट, वनडे, ट्वेन्टी२०- कार्तिक सगळीकडे समान सहजतेने वावरला. कार्तिकने खऱ्या अर्थाने ‘पॅराडाईम शिफ्ट’ अनुभवला. कार्तिकने भविष्यात पुस्तक लिहिलं तर संक्रमणाच्या हिंदोळ्यावर असंच त्याचं शीर्षक असायला हवं.

खरंतर दिनेश कार्तिकने हिरमुसायला हवं. कोशात जायला हवं. आमचं नशीबच नाही म्हणून मान मुडपून बसायला हवं. कारण कार्तिकच्या उमेदीच्या काळात महेंद्रसिंग धोनी क्रिकेटच्या पटलावर आला. तो काळही खास असा. वायटूकेच्या प्रश्नातून जग बाहेर येत होतं. आयटीत काम करणारी माणसं ऐटीत जगू लागली होती. मध्यमवर्ग कूस ओलांडून अप्पर मध्यमवर्गाच्या दिशेने जाऊ पाहत होता. डीडीचं प्रसारण मागे पडून खाजगी कंपन्यांचं प्रक्षेपण चाहत्यांच्या मनात फिट बसू लागलं होतं. चालत, सायकलवर जाण्याऐवजी बाईक्सची क्रेझ वाढू लागली होती.

कार्तिक आणि धोनी दोघंही विकेटकीपिंग करायचे. तांत्रिकदृष्ट्या कार्तिक धोनीच्या तुलनेत सफाईदार विकेटकीपिंग करायचा. संघाचं संतुलन राखण्यासाठी विकेटकीपरने फलंदाजी करावी हा मापदंड रुळत होता. विकेटकीपर फलंदाजी करणारा असेल तर संघाला अतिरिक्त फलंदाज किंवा गोलंदाज खेळवता येतो. कार्तिक उत्तम फलंदाजी करायचा. पण धोनीकडे अफाट ताकद होती. पल्लेदार चौकार-षटकार लगावण्याची क्षमता त्याच्या बाहूत होती. कार्तिक कर्णधार होता. धोनीही कर्णधार होता. यष्टीपाठी नसतील तर मैदानात दोघेही उत्तम क्षेत्ररक्षक होते. कार्तिक चेन्नईचा तर धोनी रांचीचा. दोघांमध्ये वयात चार वर्षाचं अंतर पण आंतरराष्ट्रीय पटलावर दोघांचंही आगमन लागोपाठच झालं. दोघांचेही कौशल्यगुण साधर्म्य साधणारे. पण महेंद्रसिंग धोनी दंतकथा सदरात गेला.

भारतीय संघाला ट्वेन्टी२० वर्ल्डकप, ५० ओव्हर वर्ल्डकप, चॅम्पियन्स ट्रॉफी, जागतिक कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान असल्यामुळे मिळणारी गदा हे सगळं धोनीच्या नेतृत्वात मिळालं. कारकीर्दीत सुरुवातीला तिसऱ्या क्रमांकावर येऊन गोलंदाजांना बुकलून काढणारा धोनी नंतर फिनिशर झाला. थंड डोक्याने सामने जिंकून देण्याचा वस्तुपाठच निर्माण केला. त्याच्या नेतृत्वाला मिडास टच म्हटलं जाऊ लागलं. गांगुलीने तयार केलेल्या पायावर कळस चढवण्याचं काम धोनीने केलं. कार्तिक कुठेही कमी नव्हता. तो त्याची लढाई लढत राहिला. कदाचित त्याचा काळ चुकला असावा पण त्याने कधीच तक्रार केली नाही. कार्तिकच्या कारकीर्दीचा आढावा घेताना धोनीचा उल्लेख वगळूच शकत नाही कारण धोनी नसता तर कार्तिकचं आयुष्य वेगळं असतं.

दुसरं कुणी असतं तर त्याने क्रिकेटला रामराम करुन वेगळं करिअर निवडलं असतं. कार्तिकने हार मानली नाही. धोनी नावाच्या पर्वतासमोर मी काय करू असा विचार त्याने केला नाही. कार्तिकने स्वत:चं शिखर निर्माण केलं. त्याने धोनीला बोल लावले नाहीत. धोनीवर कुरघोडी करायचा प्रयत्न केला नाही. त्याने त्याचा कॅनव्हास निवडला, त्याला तो अनेकदा गुंडाळावा लागला. तो पुन्हा पुन्हा येत राहिला. विदेशात खेळणं अवघड असतं. २००७ मध्ये भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर होता. या दौऱ्यात वासिम जाफर आणि दिनेश कार्तिक आपले सलामीवीर होते. नॉटिंगघमला चेंडू प्रचंड स्विंग होत असताना ढगाळ वातावरणात कार्तिकने केलेल्या ७७ धावांचं मूल्य पाटा खेळपट्टीवर ठोकलेल्या शतकांपेक्षा अधिक आहे. याच मालिकेत ओव्हलला कार्तिकने ९१ धावांची खेळी साकारली होती. कसोटी क्रिकेट पारंपरिक प्रकार क्षमतेची, कौशल्याची कसोटी पाहतो. या प्रकारात कार्तिकने सगळ्यात कठीण भूमिकेत स्वत:ला सिद्ध केलं. कार्तिक कॅलिडोस्कोपी जादूगारच आहे.

युवा पिढीला कार्तिकची ओळख निधास ट्रॉफीमधल्या ‘त्या’ अद्भुत खेळीसाठी आहे. १८ मार्च २०१८. कोलंबो इथे तिरंगी मालिकेचा सामना. बांगलादेशने भारताला लक्ष्य दिलं होतं १६७. या लक्ष्यासमोर खेळताना भारताच्या १३३/५ धावा झालेल्या. १२ चेंडूत ३४ धावांची आवश्यकता होती. कर्णधार रोहित शर्माने हुशारीने फिनिशरच्या भूमिकेसाठी लाडका मित्र डीकेला मागे ठेवलं होतं. कार्तिकला हे आवडलं नाही कारण तो उत्तम फॉर्मात होता. आधी जाऊन सामना जिंकून देऊ शकत होता. पण रोहित त्याच्या भूमिकेवर ठाम राहिला. कार्तिक खेळायला उतरला तेव्हा समीकरण कठीण झालं होतं. कार्तिकने पहिल्याच चेंडूवर गोलंदाजांच्या डोक्यामागे खणखणीत षटकार खेचला. दुसऱ्या चेंडूवर कार्तिकने चौकार वसूल केला. बांगलादेशचे चाहते त्यांच्या संघाला आवाजी पाठिंबा देत होते. अशा वातावरणात कार्तिकने तिसरा चेंडू डीप स्क्वेअर लीगच्या दिशेने सीमारेषेबाहेर पिटाळला. चौथा चेंडू निर्धाव गेला. पाचव्या चेंडूवर जीवाची बाजी लावत कार्तिकने २ धावा मिळवल्या. सहाव्या चेंडूवर अक्रॉस जाऊन पॅडल स्वीप करत कार्तिकने चौकार लगावला. कार्तिकने रुबेल हुसेनच्या षटकात २२ धावा चोपून काढत सामन्याचं पारडं भारताच्या बाजूने फिरवलं.

शेवटच्या षटकातल्या पहिल्या चेंडूवर विजय शंकरला एकही धाव घेता आली नाही. पंचांनी वाईड दिला. ६ चेंडूत ११ धावांची आवश्यकता होती. पुढचा चेंडू निर्धाव गेला. दुसऱ्या चेंडूवर शंकरने एक धाव घेत कार्तिकला स्ट्राईक दिला. आता ४ चेंडूत १० धावांची आवश्यकता होती. तिसऱ्या चेंडूवर कार्तिकने एक धाव घेतली. चौथ्या चेंडूवर शंकरने शिताफीने चेंडू खेळून काढत चौकार मिळवला. २ चेंडू ५ धावा असं समीकरण असताना पाचव्या चेंडूवर शंकर लाँगऑफला झेल देऊन बाद झाला. शंकर बाद झाल्याने समीकरण झालं १ चेंडू आणि ६ धावा. बांगलादेशच्या चाहत्यांचा आवाज टिपेला पोहोचलेला. करो या मरो अशी स्थिती. सौम्या सरकारच्या ऑफस्टंप बाहेरच्या चेंडूवर कार्तिकने कव्हरच्या डोक्यावरून उत्तुंग फटका लगावला. चेंडू बघता बघता प्रेक्षकांमध्ये जाऊन पडला आणि मैदानात शांतता पसरली आणि भारताच्या कॅम्पमध्ये जल्लोष. भारतीय खेळाडूंनी मैदानात धाव घेत कार्तिकला गराडा घातला. त्याला उचलून घेतलं. घामाने निथळून निघालेल्या कार्तिकच्या चेहऱ्यावर विजयी समाधान विलसत होतं. अवघ्या ८ चेंडूत नाबाद २९ धावांची ही खेळी भारतीय क्रिकेटमधल्या संस्मरणीय खेळींपैकी एक मानली जाते.

२६ टेस्ट, ९४ वनडे आणि ६० ट्वेन्टी२० सामने ही आकडेवारी कार्तिकची गुणवत्तेला न्याय देणारी आहे का? नक्कीच नाही. पण कार्तिक आकडेवारीपल्याड आहे. धोनी ‘लार्जर दॅन लाईफ’ होत असताना फारच कमी विकेटकीपर बॅट्समन तरले. कार्तिक त्या मोजक्या झुंजार लोकांपैकी एक. १ ते ८ यापैकी प्रत्येक क्रमांकावर कार्तिकने फलंदाजी केली आहे. संघाची जी गरज असेल ती कार्तिकने पूर्ण केली आहे. अमुकच फॉरमॅट खेळणार असं म्हणण्याचा काळ असताना कार्तिक ऑल फॉरमॅट स्पेशालिस्ट आहे.

कार्तिकचा आयपीएल प्रवासही त्याच्या बहुपेडी असण्याची साक्ष देणारा. दिल्ली, पंजाब, मुंबई, बंगळुरू, कोलकाता, गुजरात अशा ६ संघाकडून कार्तिक खेळला. प्रत्येक संघाचा तो प्रथम प्राधान्य विकेटकीपर होता. काहींसाठी फिनिशरही होता. काहींचा तर कॅप्टनही होता. आयपीएल संदर्भातली एक आकडेवारी अचंबित करणारी आहे. २००८ ते २०२४ असे आयपीएलचे सलग १७ हंगाम खेळणारे अतिशय मोजके खेळाडू आहेत. कार्तिक त्यापैकी एक आहे. कामगिरीत सातत्याच्या बरोबरीने त्याने जपलेला फिटनेस युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरावा.

काही वर्षांपूर्वी खेळातून निवृत्ती स्वीकारलेली नसताना कार्तिकने कॉमेंट्री बॉक्समध्ये पदार्पण केलं, तेही इंग्लंडमध्ये. खेळाचा, वातावरणाचा सखोल अभ्यास, असंख्य खेळाडूंशी असलेली मैत्री यामुळे कार्तिकचं बोलणं ऐकणं ही पर्वणी असते. पुढच्या चेंडूवर काय होईल याची कार्तिकने केलेली भाकितं तंतोतंत खरी ठरलेली आहेत. नासिर हुसेन, माईक आथर्टन आणि डीके यांच्यात रंगणारी जुगलबंदी ज्ञानात भर टाकणारी आणि तरीही मजेशीर असते.

वाढती स्पर्धा, प्रलोभनं, स्वत:च्या क्षमतेविषयी साशंकता, फिटनेसप्रति आळस यामुळे अनेक युवा मंडळींना नैराश्य ग्रासतं. शंभर टक्के प्रयत्न करण्याआधीच झटपट नैराश्य येतं. अशा सगळ्यांसाठी कार्तिक आदर्श ठरावा. तक्रार करत बसू नका, आपल्या कौशल्य पोतडीत भर घालत चला, संधी मिळाली की त्याचं सोनं करा, फिट राहा, संघर्ष करा हे सूत्र कार्तिक जगला. वाचाळवीरांच्या दुनियेत असा कृतिशील शिलेदार दुर्मीळच. त्यामुळे ‘डीके’चं नसणं अधिक सलणारं असेल…

Story img Loader