रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेल याने पुन्हा एकदा आपले महत्त्व मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात गुरुवारी दाखवून दिले. नाबाद ९२ धावांची खेळी खेळून त्याने मुंबई इंडियन्सपुढे १५६ धावांचे आव्हान ठेवण्यात मोलाची भूमिका निभावली. रॉयल चॅलेंजर्सचा संघ कायम गेलवरच अवलंबून असतो, असा सूर त्याच्या कालच्या खेळीनंतर उमटल्यानंतर आपल्याला त्यात काही वावगे वाटत नसल्याचे संघाचा कर्णधार विराट कोहली याने म्हटले आहे. 
आयपीएलच्या मागच्या मोसमातही गेलने आक्रमक खेळी केली होती. मैदानाच्या चौफेर चौकार, षटकार मारून त्याने प्रतिस्पर्धी संघाची गोलंदाजी फोडून काढली. यंदाच्या मोसमातील रॉयल चॅलेंजर्सच्या पहिल्याच सामन्यात पुन्हा एकदा गेलने आपल्या फटकेबाजीने क्रीडाप्रेमींचे मन जिंकले. त्याने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात अवघ्या ५८ चेंडूंत नाबाद ९२ धावा काढल्या. ११ चौकार आणि पाच खणखणीत षटकारांच्या साह्याने त्याने ही धावसंख्या उभारली. त्याच्या या कामगिरीनंतर बोलताना कोहली म्हणाला, गेल आमच्या संघातील सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे. तो ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट फलंदाज असल्याचे त्याने आपल्या खेळीतून सिद्ध केलंय. तो केवळ फटकेबाजी मारण्याचा विचार करीत नाही, तर संघासाठी धावांचा डोंगर कसा तयार करता येईल, याकडेही तो लक्ष देतो. गेलवर अवलंबून असलेला संघ, असे जरी कोणी आम्हाला म्हटले तरी मला काळजी करण्यासारखे काही वाटत नाही. अर्थात या मोसमातील पहिल्याच सामन्यावरून इतका मोठा तर्क लावता येणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dont mind attached to chris gayle tag says virat kohli