आयपीएलचा तेरावा हंगाम आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. १९ सप्टेंबरला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. परंतू सध्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या संघात ३ वन-डे सामन्यांची मालिका खेळवली जाणार असल्यामुळे सलामीच्या सामन्यासाठी या संघाचे खेळाडू उपलब्ध असतील का याबाबत शंका निर्माण झाली होती. परंतू कोलकाता नाईट रायडर्सच्या पहिल्या सामन्यासाठी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू उपलब्ध असतील अशी माहिती KKR चे CEO वेंकी मैसूर यांनी दिली आहे.

करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, बीसीसीआयने आयपीएलसाठी Bio Secure Bubble तयार केलं आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू हे एका Bio Secure Bubble मधून दुसऱ्या Bubble मध्ये प्रवास करत असल्यामुळे त्यांना क्वारंटाइन व्हायची गरज नाहीये. त्यामुळे संघाच्या पहिल्या सामन्यासाठी ते उपलब्ध असणार आहे. बाहेरील देशांतून येणारा व्यक्ती करोना पॉझिटीव्ह असेल तरच त्याला दुबईत क्वारंटाइन व्हावं लागत आहे. १६ सप्टेंबरला इंग्लंड-ऑस्ट्रेलिया मालिका संपत असून इंग्लंड-ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना विशेष चार्टर्ड विमानाने दुबईत आणलं जाईल. त्यामुळे २३ तारखेच्या पहिल्या सामन्यासाठी ते उपलब्ध असतील अशी माहिती मैसूर यांनी दिली.

परंतू अद्याप याबद्दल कोणाताही अंतिम निर्णय झालेला नाही. दुबईतील सरकारी अधिकाऱ्यांसोबत याविषयी चर्चा सुरु असल्याचं मैसूर यांनी सांगितलं. १७ तारखेला दुबईत आल्यानंतर खेळाडूंना क्वारंटाइन करण्याची गरज लागली तर ६ दिवसांच्या कालावधीनंतर ते २३ तारखेला पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध राहू शकतात, ESPNCricinfo ला दिलेल्या मुलाखतीत मैसूर बोलत होते. इंग्लंडचा कर्णधार मॉर्गन, फलंदाज टॉम बँटन आणि ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स हे यंदाच्या आयपीएल हंगामात KKR चं प्रतिनिधीत्व करणार आहेत.