पुणे वॉरियर्सवर दणक्यात विजय मिळवून अॅडम गिलख्रिस्टच्या नेतृत्वाखालील किंग्ज इलेव्हन पंजाबने आयपीएलच्या सहाव्या मोसमाची सुरुवात थाटात केली, पण मुंबई इंडियन्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागलेल्या चेन्नई सुपर किंग्जना आता बुधवारी होणाऱ्या सामन्यात पंजाबच्या अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.
सलामीच्या सामन्यात मुंबईकडून पराभूत झाल्यानंतर चेन्नईला विजयपथावर परतण्यासाठी मागील सामन्यातील चुकांची पुनरावृत्ती टाळावी लागणार आहे. चेन्नईने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ केल्यास पंजाबविरुद्ध विजय मिळवताना त्यांना फारशा अडचणी येणार नाहीत, पण अननुभवी खेळाडूंसह खेळणाऱ्या पंजाबला कमी लेखून त्यांना चालणार नाही. पुणे वॉरियर्सविरुद्ध पंजाबने आठ विकेट्सनी विजय मिळवला होता. पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या घरच्या मैदानावर होणाऱ्या या सामन्यात गेल्या सामन्याची पुनरावृत्ती करण्याचा पंजाबचा मानस आहे.
पंजाबच्या गोलंदाजांनी पहिल्या सामन्यात शिस्तबद्ध गोलंदाजीचे प्रदर्शन केले होते. त्यामुळेच पुण्याला अवघ्या ९९ धावांवर रोखण्यात पंजाबला यश मिळाले होते. दुखापतीतून पुनरागमन केलेल्या प्रवीण कुमारने दोन विकेट्स मिळवत पंजाबला सुरेख सुरुवात करून दिली होती. त्याचबरोबर रायन हॅरिस, परविंदर अवाना आणि लेगस्पिनर पीयूष चावला यांनी पुण्याच्या फलंदाजांना चांगलेच जखडून ठेवले होते. डेव्हिड हसी आणि पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू अझर मेहमूद यांच्या कामगिरीवर पंजाब संघ अधिक अवलंबून आहे. पुण्याचे माफक धावांचे आव्हान पेलताना मनदीप सिंगने फलंदाजीत चमक दाखवली होती. आयपीएलच्या पदार्पणाच्या सामन्यात मनन व्होरा याने २८ चेंडूंत ४३ धावांची लयलूट करत सर्वाचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र घरच्या मैदानावर विजय मिळवायचा असल्यास, पंजाबला कामगिरीत सातत्य ठेवावे लागणार आहे.
मुंबईकडून नऊ धावांनी हार पत्करल्यामुळे चेन्नईच्या ड्रेसिंगरूममध्ये निराशा पसरली होती. बेजबाबदार फटकेबाजीचा फटका या सामन्यात चेन्नईला बसला होता. महेंद्रसिंग धोनीचा चांगला फॉर्म ही प्रतिस्पध्र्यासाठी धोक्याची बाब ठरू शकते. चेन्नईचा संघ कागदावर सरस वाटत असला तरी गेल्या मोसमात पंजाबने चेन्नईला दोन्ही वेळा पराभूत केले होते, हे विसरून चालणार नाही. चेन्नईला मायकेल हसी, मुरली विजय, ड्वेन ब्राव्हो आणि सुरेश रैना यांच्याकडून उपयुक्त योगदानाची अपेक्षा आहे. त्याचबरोबर रवींद्र जडेजा आणि एस. बद्रिनाथ यांनीही फलंदाजीत मोलाचा हातभार लावावा, असे कर्णधार धोनीला वाटते.
चेन्नई संघ आल्बी मॉर्केलवर जास्तच अवलंबून आहे. मात्र सोमवारी भारतात परतलेला मॉर्केल पंजाबविरुद्ध खेळण्याची शक्यता फारच कमी आहे. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या ट्वेन्टी-२० सामन्यात गोलंदाजी करताना मॉर्केलच्या घोटय़ाला दुखापत झाली होती, पण त्यावर उपचार घेतल्यानंतर त्याला आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज बेन लाफलिन आणि अंकित राजपूत यांनी पहिल्या सामन्यात चांगली गोलंदाजी करत प्रत्येकी एक विकेट मिळवली होती. त्यामुळे पंजाबविरुद्ध त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
सामन्याची वेळ : रात्री ८ वा.पासून

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा