Pakistan Fan Watching IPL During Live PSL Match: भारतात आयपीएल २०२५ स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेला जगातील सर्वांत मोठ्या क्रिकेट लीग स्पर्धेचा दर्जा मिळालेला आहे. या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू खेळतात, तर दुसरीकडे पाकिस्तानात पाकिस्तान सुपर लीग २०२५ स्पर्धा सुरू आहे. ही स्पर्धा आयपीएल सुरू होण्याआधी खेळवली जाते, मात्र यावर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनामुळे पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा होऊ शकली नव्हती, आता योगायोगाने दोन्ही स्पर्धा एकाच वेळी सुरू आहेत.

पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत तेच खेळाडू खेळतात, जे आयपीएलमध्ये अन्सोल्ड झालेले असतात. जेव्हापासून या स्पर्धेला सुरुवात झाली आहे, तेव्हापासून पाकिस्तानच्या क्रिकेट चाहत्यांना हेच वाटतं की, आमची लीग ग्रेट आहे. पाकिस्तानच्या खेळाडूने तर असंही म्हटलं होतं की, भारतातील क्रिकेट चाहते आयपीएल सोडून पाकिस्तान सुपर लीग पाहतील, कारण या स्पर्धेची क्रेझ खूप जास्त आहे. मात्र, आता उलटं चित्र पाहायला मिळालं आहे. पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा पाहायला काही मोजकेच चाहते मैदानात येतात. त्यातही एक चाहता मैदानात आला, पण मैदानात येऊन मोबाइलवर आयपीएलचे सामने पाहताना दिसून आला, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

पीएसएल स्पर्धेला सुरुवात झाल्यापासून या स्पर्धेची तुलना आयपीएलसोबत केली जात आहे. मात्र, सर्वच बाबतीत आयपीएलने पीएसएलला मागे सोडलं आहे. आयपीएलमध्ये खेळण्यासाठी जगभरातील सर्वच खेळाडू नाव नोंदणी करतात. या खेळाडूंवर लिलावात कोटींची बोली लावली जाते. खेळाडूंना वर्ल्डक्लास सुविधा दिल्या जातात. खेळाडूंना मिळणारी बक्षिसाची रक्कमदेखील चांगली असते; तर पाकिस्तान सुपर लीगमध्ये याहून उलट आहे

पीएसएल पाहण्यासाठी गेला अन् आयपीएल पाहत बसला

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, १५ एप्रिलला लाहोर कलंदर्स विरुद्ध कराची किंग्ज असा सामना पार पडला. कराचीमध्ये पार पडलेला सामना पाहण्यासाठी चाहते मैदानावर तर गेले, पण त्यांना पाकिस्तान सुपर लीग पाहण्यापेक्षा आयपीएल पाहण्यात जास्त रस होता. समोर लाईव्ह सामना सुरू असताना हा चाहता मोबाइलमध्ये आयपीएलचा सामना पाहताना दिसून आला. या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना लाहोर कलंदर्सने २० षटकांअखेर ६ गडी बाद २०१ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना कराची किंग्जचा डाव १३६ धावांवर आटोपला.