सनरायजर्स हैदराबादविरुद्ध ‘सुपर सिक्स’मध्ये पत्करलेल्या पराभवाचा बदला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने बुधवारी घेतला. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर विराट कोहलीने झंझावाती फलंदाजीचे शानदार प्रदर्शन केले. आता याच विजयाच्या लाटेवर स्वार होऊन गतविजेत्या कोलकाता नाइट रायडर्सला हरविण्याचे मनसुबे बंगळुरूने आखले आहेत.
कोहलीच्या नेतृत्वाखालील बंगळुरूने मंगळवारी हैदराबादचा ७ विकेट आणि १४ चेंडू राखून पराभव केल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावला आहे. आर. पी. सिंगने २७ धावांत ३ बळी घेऊन हादरवल्यानंतर कोहलीने या सामन्यात ११ चौकार आणि ४ षटकारांसह ४७ चेंडूंत ९३ धावा करून विजयाची मुहूर्तमेढ रचली.
आयपीएलच्या सहाव्या पर्वाची ख्रिस गेलने बंगळुरूला दमदार सुरुवात करून दिली, परंतु त्यानंतरच्या दोन सामन्यांत तो आपला प्रभाव दाखवू शकला नाही. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात ए बी डी’व्हिलियर्सने कोहलीसोबत ४९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. त्यात डी’व्हिलियर्सचे योगदान १५ धावांचे होते. याशिवाय तिलकरत्ने दिलशान, अ‍ॅन्ड्रय़ू मॅकडोनल्ड, मयांक अगरवाल आणि मोझेस हेन्रिक्स अशी दिमाखदार फलंदाजीची फळी आहे.
झहीर खानच्या अनुपस्थितीत विनय कुमार बंगळुरूच्या वेगवान माऱ्याची धुरा सांभाळत आहे. मुथय्या मुरलीधरन आणि मुरली कार्तिक यांच्यावर संघाच्या फिरकीची मदार आहे.
दुसरीकडे चालू हंगामाची शानदार सुरुवात करणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्सला आपला विजयी आवेश पुढे राखता आला नाही. राजस्थान रॉयल्सचे १४५ धावांचे सोपे आव्हान पेलताना त्यांना १९ धावांनी पराभव सहन करावा लागला. त्यामुळे बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात फलंदाजांची कामगिरी आणि भागीदाऱ्या यांच्यासह कोलकाता आपला रूबाब दाखवेल.
जॅक कॅलिस, गौतम गंभीर आणि मनोज तिवारी यांच्याकडून कोलकात्याला मोठय़ा अपेक्षा आहेत. याचप्रमाणे युसूफ पठाण आणि लक्ष्मी रतन शुक्ला हेसुद्धा त्यांच्या दिमतीला आहेत. ईऑन मॉर्गनसुद्धा बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात आपला फॉर्म दाखवू शकेल. राजस्थानविरुद्ध त्याने ३८ चेंडूंत ५१ धावा केल्या होत्या. ब्रेट ली, सुनील नरिन, शामी अहमद आणि लक्ष्मीपती बालाजी हे गोलंदाज बंगळुरूच्या फलंदाजांवर अंकुश ठेवू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा