खराब फॉर्म, कामगिरीत सातत्याचा अभाव, कर्णधाराला झालेली गंभीर दुखापत या सगळ्या पार्श्वभूमीवर ४३वर्षीय महेंद्रसिंग धोनीने चेन्नई सुपर किंग्सचं नेतृत्व हाती घेतलं. धोनीचा मिडास टच चेन्नईचं नशीब बदलवणार अशी चर्चा होती. मात्र प्रत्यक्षात कोलकाता नाईट रायडर्सच्या शिस्तबद्ध खेळासमोर चेन्नईचा घरच्या मैदानावर धुव्वा उडाला. चेपॉक हा चेन्नई सुपर किंग्सचा गड. पण कोलकाताने हा गड नेस्तनाबूत केला. १८ वर्षात चेन्नईच्या नावावर अनेक मोठमोठे विक्रम नोंदले गेले पण शुक्रवारी नीचांकी विक्रमांनी टोक गाठलं.

कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. कोलकाताचा कर्णधार अजिंक्य रहाणे, मोईन अली आणि मेन्टॉर ड्वेन ब्राव्हो हे तिघेही चेन्नईसाठी खेळले आहेत. त्यामुळे इथल्या खेळपट्टीची त्यांना सखोल माहिती होती. या तिघांनीच चेन्नईच्या पतनाची आखणी केली. चेन्नईच्या फलंदाजांना १०३ धावांचीच मजल मारता आली. आयपीएलच्या १८ वर्षांच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्सची घरच्या मैदानावरची ही सगळ्यात नीचांकी धावसंख्या आहे. इतकी वर्ष प्रतिस्पर्धी संघांना चेन्नईत येऊन खेळणं कठीण जात असे, जिंकण दूरची गोष्ट. पण कोलकाताने हे सगळं खोटं ठरवलं.

चेन्नई सुपर किंग्स संघाच्या इतिहासातली ही तिसरी नीचांकी धावसंख्या आहे.

घरच्या मैदानावर सलग तीन सामने गमावण्याची चेन्नईची ही पहिलीच वेळ आहे. १८ वर्षांच्या इतिहासात सलग ५ सामने गमावण्याचीही चेन्नईची पहिलीच वेळ आहे.

चेंडू शिल्लक राखून हरण्याच्या निकषातही चेन्नईचा हा सगळ्यात मानहानीकारक पराभव आहे. कोलकाताने तब्बल ५९ चेंडू राखून विजय मिळवला.

चेन्नईचा नवनियुक्त कर्णधार महेंद्रसिंग धोनीने या पराभवाची मीमांसा केली. धोनी म्हणाला, आमचा खेळ अगदीच सर्वसाधारण झाला. सगळ्यांनीच आपल्या खेळाचं सखोल परीक्षण करायला हवं असा दिवस होता. खेळपट्टी आव्हानात्मक होती पण त्यावर कसं खेळायचं हे समजायला हवं होतं. आम्ही पुरेशा धावा करू शकलो नाही. चेंडू थांबून बॅटवर येत होता. दर्जेदार फिरकीपटूंविरुद्ध खेळताना हा मुद्दा कळीचा ठरतो. आम्ही मोठ्या भागीदाऱ्या रचू शकलो नाही. पॉवरप्लेसंदर्भात परिस्थिती लक्षात घेणं आवश्यक आहे. काही सामन्यात आम्ही पॉवरप्लेच्या षटकांचा फायदा उठवला आहे. आम्ही कुणासारखे तरी खेळू शकत नाही किंवा कुणासारखे तरी होऊ शकत नाही. आमच्याकडे चांगल्या दर्जाचे सलामीवीर आहेत. धावगतीचं आव्हान किंवा धावसंख्येचं दडपण घ्यायची आवश्यकता नाही. एखादा चौकार वसूल झाला तरी चित्र बदलतं. पॉवरप्लेमध्ये ६० धावा करू म्हटलं की गोष्टी बिघडतात. झटपट विकेट्स गमावल्या तर मधल्या फळीने परिस्थिती ओळखून खेळ करायला हवा. कारण तसं झालं नाही तर हाणामारीच्या षटकात फटकेबाजी करायला फलंदाजच उरत नाहीत’.