Wasim Akram’s advice to Prithvi Shaw : दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉला एकेकाळी भारताचा उदयोन्मुख फलंदाज म्हणून पाहिले जात होते, परंतु तो फलंदाजीत सातत्य राखू शकला नाही, ज्यामुळे त्याच्या कारकिर्दीला मोठा धक्का बसला. आयपीएल २०२४ च्या हंगामातही पृथ्वीची कामगिरी चांगली नसल्यामुळे त्याच्यावर टीका होत आहे. संघाला त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या, पण पृथ्वीला संघाच्या यशात हातभार लावता आला नाही. आता पाकिस्तानचा माजी खेळाडू वसीम अक्रमने पृथ्वीला सल्ला दिला आहे. पृथ्वीने पार्ट्यां करण्याऐवजी क्रिकेटवर अधिक लक्ष केंद्रित करावे, असे त्याने म्हटले आहे.
यंदा त्याच्या कामगिरीत सुधारणा झाली असली, तरी तो अजूनही आपल्या फॉर्मच्या शोधात आहे. पृथ्वी शॉने चालू हंगामात ८ सामन्यात १६३.६४ च्या स्ट्राईक रेटने १९८ धावा केल्या आहेत. दिल्लीच्या शेवटच्या सामन्यात तो प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता, ज्यामध्ये जेक फ्रेझर-मॅकगर्क आणि अभिषेक पोरेल यांनी दिल्लीच्या डावाला शानदार सुरुवात करुन दिली होती.आता पाकिस्तानचा माजी दिग्गज खेळाडू वसीम अक्रमने पृथ्वी शॉच्या संघर्षांबद्दल सांगितले आहे. अक्रमने शॉच्या प्रतिभेची प्रशंसा केली, परंतु विसंगत कामगिरीमुळे तसेच मैदानाबाहेरील समस्यांमुळे राष्ट्रीय संघात स्थान मिळविण्याच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या युवा खेळाडूला महत्वाचा सल्ला दिला आहे.
‘पार्ट्यांवर नव्हे, तर क्रिकेटवर लक्ष केंद्रित करावे’ –
स्पोर्ट्सकीडाशी बोलताना वसीम अक्रम म्हणाला, “या वर्षी मी त्याला जवळून पाहिले नाही, पण त्याला मूलभूत गोष्टींकडे परत जावे लागेल, प्रथम श्रेणी क्रिकेट खेळावे लागेल आणि मोठी धावसंख्या उभारावी लागेल. त्यासाठी त्याने पार्ट्यांवर नव्हे, तर क्रिकेटवर लक्ष केंद्रित करावे.” वसीम अक्रम पुढे म्हणाला, “त्याच्यामध्ये अजूनही खूप क्रिकेट आहे, फक्त माघारी जाऊन प्रथम श्रेणी क्रिकेट खेळावे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये भरपूर शतके करावीत आणि पुनरागमन करावे. हाच टीम इंडियात परतण्याचा एकमेव मार्ग आहे. यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. त्याच्याकडे अजून वेळ आहे आणि हे त्याच्यासाठी चांगले आहे.”
पृथ्वीला नियमितपणे खेळावे लागेल –
पृथ्वी शॉ २०२१ मध्ये टीम इंडियाकडून शेवटचा खेळला होता, जेव्हा तो श्रीलंकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी संघाचा भाग होता. वसीम अक्रमने यावर भर दिला की शॉने नियमितपणे खेळणे आणि मैदानाबाहेर स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. वसीम अक्रम पुढे म्हणाला, “त्याला नियमितपणे खेळावे लागेल आणि मैदानाबाहेर स्वतःवर लक्ष केंद्रित करावे लागेल. निवृत्तीनंतर तुम्हाला हव्या तितक्या पार्ट्या करा, त्यावेळी कोणाला पर्वा नसेल. पण आता क्रिकेटवर लक्ष केंद्रित करावे.”