Matthew Hayden gives batsmen tips to deal with Mayank Yadav’s fast bowling : आयपीएल २०२४ मध्ये लखनऊकडून खेळणाऱ्या मयंक यादवचा हा पदार्पणाचा हंगाम आहे. या युवा वेगवान गोलंदाजाने आतापर्यंत फक्त २ सामने खेळले आहेत. दोन्ही सामन्यात संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मयंक सलग दुसऱ्यांदा सामनावीर ठरला. मयंक यादवच्या वेगाचे भल्या-भल्या फलंदाजांकडे उत्तर नाही. दरम्यान, माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर मॅथ्यू हेडनने मयंकविरुद्ध खेळण्यासाठी फलंदाजांना काही टिप्स दिल्या, ज्यामुळे त्यांना या २१ वर्षीय वेगवान गोलंदाजाविरुद्ध रणनीती बनवण्यात मदत होईल.
आयपीएलच्या १७व्या हंगामातील १५व्या सामन्यात लखनऊने बंगळुरुवर २८ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात मयंकने पुन्हा एकदा आपला वेग आणि कौशल्य दाखवले. शनिवारी १५० किमी प्रतितासचा टप्पा ९ वेळा पार केल्यानंतर, त्याने १५५.८ किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला होता, जो चालू हंगामातील सर्वात वेगवान चेंडू होता. मात्र, मंगळवारी मयंकने स्वतःचाच विक्रम मोडला. मंगळवारी एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीविरुद्धच्या सामन्यात त्याने पुन्हा एकदा आयपीएल २०२४ मधील सर्वात वेगवान चेंडू १५६.७ किमी प्रतितास वेगाने टाकून सर्वांना चकित केले.
मॅथ्यू हेडन म्हणाला की, “या स्पर्धेत घडणाऱ्या गोष्टींपैकी एक म्हणजे सध्या सर्वांच्या नजरा मयंक यादववर आहेत, प्रत्येकजण त्याच्या चेंडूचा सामना कसा करायचा या रणनीतीवर काम करत आहे. गुड लेन्थवर चांगल्या वेगाने येणाऱ्या चेंडूला मारणे कठीण असते. या प्रकारचा चेंडू खेळण्याचा योग्य मार्ग म्हणजे तुम्हाला चेंडू तुमच्याकडे येऊ द्यावा लागेल. फलंदाजांनी बळजबरीने चेंडूला मारण्याच्या नादात पुढच्या पायावर किंवा मागच्या पायावर जाऊ नये. फक्त दबाव हातळला आणि बाकीचे काम चेंडूच करेल. कारण तो खूप वेगाने येत असेल.”
मयंकने आतापर्यंत आपल्या गोलंदाजीने जॉनी बेअरस्टो, फाफ डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल सारख्या बलाढ्य फलंदाजांना बाद केले.आरसीबी विरुद्धच्या सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर मयंक यादवचा स्पेल जोपर्यंत चालू होता तोपर्यंत विरोधी संघाच्या फलंदाजांमध्ये भीतीचे वातावरण होते. फलंदाजांना त्यांच्या बॅटला चेंडूचा स्पर्शही करता आला नाही. मयंकने आरसीबीविरुद्ध ४ षटकात १४ धावा देत ३ विकेट्स घेतल्या.