Ambati Rayudu Angry On Rishabh Pant: आयपीएल २०२५ स्पर्धेत मंगळवारी झालेल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात केएल राहुल आणि अभिषेक पॉरेलच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या बळावर दिल्लीने लखनऊवर एकतर्फी विजयाची नोंद केली. या सामन्यानंतर लखनऊचा कर्णधार ऋषभ पंतवर जोरदार टीका होत आहे.
ऋषभ पंत आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू आहे. आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात लखनऊ सुपर जायंट्सने त्याला २७ कोटींची बोली लावून आपल्या संघात स्थान दिलं. मात्र तो फलंदाजीत पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. आतापर्यंत झालेल्या ९ सामन्यांमध्ये त्याला अवघ्या १०६ धावा करता आल्या आहेत. दिल्लीविरुद्ध झालेल्या सामन्यात तो सातव्या क्रमांकावर आला. ऋषभ पॅडअप करून होता, पण त्याला शेवटचे २ चेंडू खेळण्याची संधी मिळाली. फलंदाजीला येऊन तो शून्यावर माघारी परतला.
अंबाती रायुडू ऋषभ पंतवर भडकला
हा सामना झाल्यानंतर अंबाती रायुडू ऋषभ पंतवर संताप व्यक्त करताना दिसून आला आहे. रायुडू म्हणाला, ” ऋषभ पंतला लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून जे निर्णय घेतले जात आहेत, त्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. त्याने वरच्या क्रमांकावर फलंदाजीला यायला हवं. त्याने कारणं सांगायला नको. तो कर्णधार आहे आणि हा कर्णधाराचा खेळ आहे. लखनऊ सुपर जायंट्सला काही महत्वाचे बदल करण्याची गरज आहे. त्यांनी मयांक यादवला प्लेइंग ११ मध्ये संधी द्यायला हवी, यासह ऋषभ पंतने वरच्या क्रमांकावर फलंदाजी करायला हवी.”
ऋषभ पंत शेवटचे दोन चेंडू खेळण्यासाठी फलंदाजीला आला
दिल्लीविरुद्ध झालेल्या सामन्यात लखनऊचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात आला. लखनऊकडून मिचेल मार्श आणि एडन मार्करमने संघाला दमदार सुरूवात करुन दिली होती. या डावात ऋषभने चौथ्या डावात फलंदाजीला यायला हवं होतं. मात्र तो शेवटचे २ चेंडू शिल्लक असताना फलंदाजीला आला. पहिला चेंडू निर्धाव राहिला, तर दुसऱ्या चेंडूवर तो त्रिफळाचित झाला. माध्यमातील वृत्तानुसार, ऋषभ सातव्या क्रमांकावर फलंदाजीला यावं हा टीम मॅनेजमेंटचा निर्णय होता. लखनऊ सुपर जायंट्स संघाच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर या संघाने आतापर्यंत ९ सामने खेळले आहेत. यादरम्यान या संघाला ५ सामने जिंकता आले आहेत, तर ४ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. हा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे.