Manoj Tiwary Statement On Ricky Ponting: पंजाब किंग्जचा संघ स्पर्धेतील पहिल्या हंगामापासून खेळत आहे. मात्र या संघाला आयपीएलची एकही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. यावेळी पंजाब किंग्ज संघाने मोठे बदल केले आहेत. कोलकाताला चॅम्पियन बनवणाऱ्या श्रेयस अय्यरकडे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवली आहे. तर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू रिकी पाँटिंगकडे संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी सोपवली आहे. हा संघ सध्या गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे. त्यामुळे पंजाबला विजय मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. मात्र, तरीदेखील पंजाबचा संघ आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, असं वक्तव्य भारताच्या माजी क्रिकेटपटूने केलं आहे.
मनोज तिवारी काय म्हणाला?
भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीने पंजाबचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगवर मोठे आरोप केले आहेत. शनिवारी कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर झालेल्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. पावसामुळे या सामन्याचा निकाल लागू शकला नव्हता.
या सामन्यानंतर बोलताना मनोज तिवारी म्हणाला, “ मला मनापासून वाटतंय की, पंजाबचा संघ आयपीएलची ट्रॉफी जिंकू शकणार नाही. कारण आज जेव्हा सामना सुरू होता तेव्हा मी पाहिलं की, मुख्य प्रशिक्षकाने फॉर्मात असलेल्या नेहाल वढेरा आणि शशांक सिंगला फलंदाजी करण्यासाठी पाठवलं नाही. या फलंदाजांच्या जागी त्यांनी परदेशी फलंदाजांवर अधिक विश्वास दाखवला. मात्र, ते विश्वास सार्थ ठरवू शकले नाही. यावरून स्पष्ट दिसतंय की, त्यांना भारतीय फलंदाजांवर विश्वास नाही. असं सुरू राहिलं तर, ते टॉप २ मध्ये असूनही आयपीएलची ट्रॉफी जिंकू शकणार नाही.”
पंजाब किंग्ज संघाबद्दल बोलायचं झालं तर, या संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी श्रेयस अय्यरकडे आहे. मनोज तिवारीने हे वक्तव्य करत ग्लेन मॅक्सवेलकडे बोट दाखवलं आहे. कारण ग्लेन मॅक्सवेलला सातत्याने संधी दिली जात आहे. मात्र तो या संधीचा फायदा घेऊ शकलेला नाही. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या सामन्यात तो फलंदाजीला आला. मात्र ९ चेंडूत त्याला केवळ ७ धावा करता आल्या आहेत.
या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर या सामन्यात पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने २० षटकअखेर २०१ धावांचा डोंगर उभारला. पंजाबकडून फलंदाजी करताना सलामीवीर फलंदाज प्रभसिमरन सिंगने ४९ चेंडूंचा सामना करत ८३ धावांची खेळी केली. तर प्रियांश आर्यने ३५ चेंडूंचा सामना करत ६९ धावांची खेळी केली. शेवटी श्रेयस अय्यरने १६ चेंडूंचा सामना करत २५ धावांची खेळी केली. कोलकाता नाईट रायडर्सला हा सामना जिंकण्यासाठी २०२ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना कोलकाताने १ षटकात ७ धावा केल्या. त्यानंतर पावसाने हजेरी लावली. हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला.