Irfan Pathan Picks 15 Man Squad : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड या महिन्याच्या अखेरीस होण्याची अपेक्षा आहे. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्यासाठी १५ सदस्यीय संघ निवडणे सोपे काम नाही. आयपीएलनंतर संघनिवड झाली असती, तर आगरकर आणि कंपनीसाठी अनेक गोष्टी सहज सुटू शकल्या असत्या. मात्र आता निवड समिती आयपीएलच्या कामगिरीकडे दुर्लक्ष करू शकत नाही. अशातच टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणने आपला टी-२० विश्वचषकासाठी १५ सदस्यीय संघ निवडला आहे.
आयपीएलच्या १७व्या हंगामात रियान परागपासून ते शिवम दुबे आणि ऋतुराज गायकवाडपर्यंत अनेक खेळाडूंनी आपल्या कामगिरीच्या जोरावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याचबरोबर हार्दिक पंड्या, श्रेयस अय्यर आणि मोहम्मद सिराज हे स्टार खेळाडू आतापर्यंत आयपीएलमध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी करण्यात अपयशी ठरले आहेत. अशात इरफान पठाणेने विराट कोहलीला आपल्या संघात स्थान दिले आहे, तर अनेक खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
इरफान पठाणने स्टार स्पोर्ट्सवर टी-२० विश्वचषकासाठी १५ सदस्यीय भारतीय संघ निवडला आहे. या संघात नुकतेच मुंबई इंडियन्सविरुद्ध शतक झळकावणाऱ्या यशस्वी जैस्वालला संधी दिली आहे. यशस्वीच्या जागेबाबत यापूर्वी बराच गदारोळ झाला होता. मात्र त्याने शतक झळकावून टीकाकारांना शांत केले. तसंच टीकाकार विराटच्या स्थानाबद्दल खूप चर्चा करत होते, पण कोहलीने त्याच्या बॅटने प्रत्युत्तर दिलं आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आरसीबीचा स्टार फलंदाज विराट सध्या अव्वल स्थानावर आहे. त्याचबरोबर पठाणने शुबमन गिललाही संघात ठेवले आहे.
हार्दिक पंड्यासमोर ठेवली ही अट –
दरम्यान, हार्दिक पंड्याबद्दल बोलायचे झाले, तर इरफान पठाणने त्याला संघात ठेवले आहे, परंतु त्याने सतत गोलंदाजी केली तरच त्याची निवड करावी, अशी अट घातली आहे. याशिवाय इरफानने रिंकू सिंगलाही आपल्या संघात ठेवले आहे. फिरकीपटूंबद्दल बोलायचे झाले तर रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, रवी बिश्नोई आणि युजवेंद्र चहल यांचाही त्यांच्या संघात समावेश आहे. जसप्रीत बुमराहला वेगवान गोलंदाज म्हणून पाठिंबा देण्यासाठी त्याने आपल्या संघात अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराजचा समावेश केला आहे. त्याचबरोबर इरफान पठाणचे असे मत आहे की, दोन वेगवान गोलंदाज, यष्टिरक्षक आणि फलंदाज यांनाही प्रवासी राखीव खेळाडू म्हणून घेऊन गेले पाहिजे.
हेही वाचा – IPL 2024: धोनी रिव्ह्यू सिस्टीम! पंचांचा निर्णय अन् लगेचच माहीचा रिव्ह्यूसाठी इशारा, पाहा काय घडलं?
टी-२० विश्वचषकासाठी इरफान पठाणचा संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पंड्या (जर तो नियमित गोलंदाजी करत असेल तर), रिंकू सिंग, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, रवी बिश्नोई/युजवेंद्र चहल, शुबमन गिल/संजू सॅमसन.