वेस्ट इंडिजचा तडाखेबंद फलंदाज शेरफन रूदरफोर्डची आयपीएलमध्ये खेळण्याची ही पहिलीच वेळ नव्हे. पण यंदाच्या हंगामात रुदरफोर्डने आपली ताकद दाखवून दिली आहे. रविवारी झालेल्या लढतीत रुदरफोर्डने १६ चेंडूत ३५ धावांची वेगवान खेळी करत गुजरातचा विजय सोपा करून टाकला. गुजरात टायटन्सने सातत्याने रुदरफोर्डला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून उपयोगात आणलं आहे. रुदरफोर्डने त्याचा इम्पॅक्ट प्रत्येक लढतीत दाखवला आहे. रुदरफोर्ड आयपीएल स्पर्धेत चार संघांकडून खेळला आहे पण त्याच्या गुणवत्तेला खरा न्याय गुजरात टायटन्स संघाने दिला आहे.

रुदरफोर्डने पंजाबविरुद्ध अहमदाबाद इथे झालेल्या लढतीत ४६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यानंतर मुंबईविरुद्ध १८ धावा केल्या. बंगळुरुविरुद्ध रुदरफोर्डने नाबाद ३० धावांची खेळी केली. हाच फॉर्म कायम राखत रुदरफोर्डने हैदराबादविरुद्धही शानदार खेळी साकारली.

आयपीएलच्या २०१९ हंगामात रुदरफोर्डने पदार्पण केलं. त्यावर्षी तो दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळला. त्याला ७ सामन्यात संधी मिळाली. दिल्लीने पुढच्याच वर्षी त्याला रिलीज केलं. २०२० मध्ये तो मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. जेतेपद पटकावणाऱ्या विजयी संघाचा तो भाग होता मात्र त्याला एकाही सामन्यात संधी मिळाली नाही. २०२२ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने संघात समाविष्ट केलं. पण त्याला केवळ तीन सामन्यात खेळवण्यात आलं. २०२४ मध्ये जेतेपद पटकावणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचा तो हिस्सा होता. पण अख्ख्या हंगामात त्याला एकाही सामन्यात संधी मिळाली नाही. या हंगामाच्या आधी झालेल्या लिलावात गुजरात टायटन्स संघाने २.६ कोटी रुपये खर्चून त्याला ताफ्यात समाविष्ट केलं. गुजरातच्या संघात न्यूझीलंडचा ग्लेन फिलीप्सही आहे. अफलातून क्षेत्ररक्षण करणाऱ्या आणि उत्तम फॉर्मात असणाऱ्या फिलीप्सला संघात घ्यावं अशी चर्चा सोशल मीडियावर रंगते पण गुजरात संघव्यवस्थापनाने रुदरफोर्डवर विश्वास ठेवला आहे आणि त्यानेही हा विश्वास सार्थ ठरवला आहे.

आयपीएलव्यतिरिक्त रुदरफोर्ड कॅरेबियन प्रीमिअर लीग, बांग्लादेश प्रीमिअर लीग, पाकिस्तान सुपर लीग, यांच्यासह लंका प्रीमिअर लीग, मेजर लीग क्रिकेट, आयएलटी२० अशा असंख्य टी२० स्पर्धांमध्ये खेळतो. त्यामुळे या प्रकारात खेळण्याचा पुरेसा अनुभव रुदरफोर्डकडे आहे. प्रचंड ताकदीने फटकेबाजी हे रूदरफोर्डचं वैशिष्ट्य आहे. फटकेबाजीच्या बरोबरीने त्याच्या खेळात नजाकतही आहे. तो उपयुक्त मध्यमगती गोलंदाजही आहे. रुदरफोर्डने १२ वनडे आणि २८ टी२० लढतीत वेस्ट इंडिजचं प्रतिनिधित्व केलं आहे.