पराभवांची मालिका खंडित कशी करायची या चिंतेत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला आणखी एक धक्का बसला आहे. धडाकेबाज खेळासाठी प्रसिद्ध ग्लेन मॅक्सवेलने अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतला आहे. तो नेमका कधी परतणार याविषयी काहीही स्पष्टता नाही.
बंगळुरू संघासाठी मॅक्सवेल महत्त्वाचा खेळाडू आहे. संघातील अनुभव खेळाडू या नात्याने मॅक्सवेलवर मोठी जबाबदारी आहे. फलंदाजीच्या बरोबरीने फिरकी गोलंदाजी आणि अफलातून क्षेत्ररक्षण ही मॅक्सवेलची जमेची बाजू आहे. पण हंगाम सुरू झाल्यापासून मॅक्सवेलला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. सोमवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या लढतीपूर्वी मॅक्सवेलने संघनिवडीसाठी माझा विचार करू नका असं संघव्यवस्थापनाला सांगितलं. त्यानुसार त्याला वगळण्यात आलं. अनिश्चित काळासाठी ब्रेक घेत असल्याचं मॅक्सवेलने स्पष्ट केलं. मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या ताजंतवानं होण्यासाठी ब्रेक घेतल्याचं मॅक्सलवेने सांगितलं.
यंदाच्या हंगामात मॅक्सवेलने ६ सामन्यात फक्त ३२ धावाच केल्या आहेत. गोलंदाज म्हणून त्याने थोडी उपयुक्तता दाखवली. पण फलंदाजीत अपयशी ठरल्याने संघासमोरची अडचण वाढली. २०२० हंगामातही मॅक्सवेलली बॅट रुसली होती. त्या वर्षी पंजाब किंग्ज संघाकडून खेळणाऱ्या मॅक्सवेलला ११ सामन्यात १०८ धावाच करता आल्या. वादळी खेळीसाठी प्रसिद्ध मॅक्सवेलला त्यावर्षी एकही षटकार लगावता आला नव्हता.
बंगळुरूचं संघव्यवस्थापन अतिशय चांगलं आहे. मी या स्थितीतून लवकरात लवकर कसा बाहेर पडू शकतो यावर आम्ही एकत्रित काम करत आहोत. या आधी सहा महिने मी उत्तम खेळत होतो. त्यामुळे आयपीएलमधल्या कामगिरीने मीच निराश झालो आहे. माझं शरीर आणि मन ताजंतवानं झालं तर मी नक्कीच स्पर्धेत पुन्हा खेळू शकेन.
३५वर्षीय मॅक्सवेलने ७ टेस्ट, १३८ वनडे आणि १०६ ट्वेन्टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. काही महिन्यांपूर्वी भारतात झालेल्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत मॅक्सवेलने पायात गोळे आलेल्या स्थितीत अफगाणिस्तानविरुद्ध मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवप २०१ धावांची अविश्सनीय खेळी साकारली होती. त्याआधी नेदरलँड्सविरुद्ध ४० चेंडूत शतक झळकावलं होतं.
आयपीएल स्पर्धेत ठसा उमटवणाऱ्या विदेशी खेळाडूंमध्ये मॅक्सवेलचा समावेश होतो. आयपीएल स्पर्धेत मॅक्सवेलने १३० सामन्यात १५६.४०च्या स्ट्राईकरेटने २७५१ धावा केल्या आहेत. यामध्ये १८ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच्या नावावर ३५ विकेट्सही आहेत. मॅक्सवेलने आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघांचं प्रतिनिधित्व केलं आहे.