IPL 2025 GT vs MI Highlights in Marathi: गुजरात टायटन्स संघाने मुंबई इंडियन्सचा ३६ धावांनी पराभव करत आयपीएल २०२५ मधील आपला पहिला विजय नोंदवला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यासह गुजरात टायटन्सने साई सुदर्शनच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर २० षटकांत १९६ धावा केल्या. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठे बदल पाहायला मिळाले. मुंबई इंडियन्सच्या फलंदाजी फळीत एकापेक्षा एक उत्कृष्ट फलंदाज असले तरी मुंबई संघाला मात्र विजय मिळवता आलेला नाही.
गुजरात टायटन्सचा संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला उतरला होता. त्यांनी प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १९६ धावा केल्या होत्या. तर प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सचा संघ ६ बाद १६० धावा करू शकला. गुजरातच्या सर्वच गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत मुंबईच्या धावांना ब्रेक लावला आणि विकेट्सही घेतले.
गुजरातने दिलेल्या १९७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरूवात चांगली झाली नाही. रोहित शर्माने पहिल्याच षटकात दोन चौकार लगावले पण तो सिराजच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. यानंतर सिराजने रायन रिकल्टनला ६ धावांवर त्रिफळचीत केलं. यानंतर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माने संघाचा डाव सावरला पण या खेळपट्टीवर खेळताना ते संघाला विजयापर्यंत नेऊ शकले नाहीत.
तिलक वर्मा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात ३६ चेंडूत ३ चौकार आणि एका षटकारासह ३९ धावा करत बाद झाला. तर सूर्या २८ चेंडूत १ चौकार आणि ४ षटकारांसह ४८ धावा करत झेलबाद झाला. रॉबिन मिन्जने पुन्हा निराश करत ३ धावा करत बाद झाला. हार्दिकही मोठी खेळी करू शकला नाही. तर नमन धीर आणि मिचेल सँटनर यांनी १८-१८ धावांची खेळी करत धावांचा पल्ला कमी केला.
प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या गुजरात संघाने चांगली सुरूवात केली आणि पॉवरप्लेमध्ये एकही विकेट न गमावता चांगली धावसंख्या उभारली. साई सुदर्शनने ४१ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ६३ धावा केल्या. तर गिल २७ चेंडूत ४ चौकार आणि एका षटकारासह ३८ धावा केल्या. बटलरने २४ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकारासह ३९ धावा केल्या. तर शाहरूख खान ९ धावा करत बाद झाला. शरफन रूदरफोर्डने १८ धावांचे योगदान दिले. मुंबई इंडियन्सकडून हार्दिक पंड्याने २ विकेट तर दीपक चहर, मुजीब उर रहमान, बोल्ट आणि सत्यनारायण राजू यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.