IPL 2025 GT vs RR Highlights in Marathi: शानदार फॉर्मात असलेल्या गुजरात टायटन्स संघाने राजस्थान रॉयल्सचा आपल्या घरच्या मैदानावर ५८ धावांनी मोठा पराभव केला आहे. या विजयासह गुजरात टायटन्सने सलग चौथा सामना जिंकला आहे. या विजयासह गुजरातचा संघ आयपीएलल २०२५ च्या गुणतालिकेत पहिल्या स्थानी पोहोचला आहे. गुजरातच्या संघाने अष्टपैलू कामगिरी करत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला आणि नंतर झटपट विकेट घेत राजस्थानला पराभवाचं पाणी पाजलं.
गुजरात टायटन्सने उत्कृष्ट गोलंदाजी करत राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांना मोठी भागीदारी रचण्यापासून दूर ठेवले आणि ठराविक अंतराने विकेट घेतले. याचे श्रेय गोलंदाजांबरोबर संघाचे कोच आशिष नेहरा यांना देखील जाते. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना २१७ धावांचा डोंगर उभारला. तर प्रत्युत्तरात राजस्थान संघाला २०० धावांचा टप्पाही गाठू दिला नाही. राजस्थानचा संघ १५९ धावांवर सर्वबाद झाला.
गुजरातने दिलेल्या २१८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या राजस्थानची सुरूवात खराब झाली. संघाने पॉवरप्लेमध्ये २ विकेट्स गमावले. यशस्वी जैस्वाल आणि नितीश राणा स्वस्तात झेलबाद झाले. संजू सॅमसन आणि रियान पराग संघाचा डाव सावरला. पण संघाला विजयाच्या दिशेने नेऊ शकले नाहीत. संजू सॅमसन ४१ धावा तर रियान पराग २६ धावा करत बाद झाले. राजस्थानने विशिष्ट फरकाने सातत्याने आपल्या विकेट्स गमावल्या आहेत.
शिमरॉन हेटमायरची बॅट या सामन्यात तळपली. हेटमायर ३२ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांसह ५२ धावा करत बाद झाला. तर इतर सर्व फलंदाज एकेरी धावांवर झेलबाद झाले. गुजरातने या सामन्यात चतुराईने गोलंदाजी करत राजस्थानच्या फलंदाजांना मोठ्या खेळी खेळण्याची संधी दिली नाही. प्रसिध कृष्णाने उत्कृष्ट गोलंदाजी करत ३ विकेट्स घेतल्या आहेत. तर राशिद खान आणि साई किशोर यांना २ विकेट्स मिळाले. याशिवाय सर्व गोलंदाजांनी १-१ विकेट्स मिळाले.
राजस्थान रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकत गुजरातला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. गुजरातची सुरूवातही शुबमन गिलच्या विकेटमुळे डगमगली. पण साई सुदर्शनने एका टोकाकडून धुव्वाधार खेळी केली. तर त्याला संघातील इतर फलंदाजांनी चांगली साथ दिली. साईने ५३ चेंडूत ८ चौकार आणि ३ षटकारांसह ८२ धावा केल्या. जोस बटलर आणि शाहरूख खानने प्रत्येकी उत्कृष्ट ३६ धावांची खेळी केली. तर राहुल तेवतियाने २४ धावांची तर राशिद खानने झटपट १२ धावांची खेळी केली आणि संघाला ६ बाद २१७ धावांपर्यंत नेले.