Lucknow Supergiants beat Gujarat Titans by 33 runs : आयपीएल २०२४ मधील २१वा सामना लखनऊ येथे झालेल्या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्सने गुजरात टायटन्सचा ३३ धावांनी पराभव केला. या विजयासह केएल राहुलच्या नेतृत्वाखाली एलएसजीने सलग तिसरा विजय नोंदवला. त्याबरोबर कर्णधार शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली गुजरातला सलग दुसरा पराभव पत्करावा लागला. रविवारी लखनऊविरुद्ध झालेल्या पराभवानंतर कर्णधार शुबमन गिलने आपल्या फलंदाजांना जबाबदार धरले. कारण त्याच्या मते फलंदाजीसाठी खेळपट्टी चांगली होती.
शुबमनने पराभवासाठी फलंदाजांना जबाबदार धरले –
अष्टपैलू मार्कस स्टॉइनिसच्या (५८ धावा) अर्धशतकानंतर यश ठाकूरच्या (३० धावांत पाच विकेट्स) चमकदार कामगिरीमुळे एलएसजीने गुजरात टायटन्सचा ३३ धावांनी पराभव केला. एलएसजीचा गुजरात टायटन्सवरील हा पहिला विजय आहे. सामन्यानंतर गिल म्हणाला, “मला वाटतं फलंदाजीसाठी खेळपट्टी चांगली होती, पण आमची फलंदाजी खराब होती. आम्ही चांगली सुरुवात केली पण मधल्या षटकांमध्ये विकेट्स गमावल्या ज्यातून आम्हाला सावरता आले नाही.”
आपल्या गोलंदाजांच्या कामगिरीचे कौतुक करताना तो म्हणाला, “आमच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत त्यांना या धावसंख्येपर्यंत रोखले. आम्हाला १७०-१८० धावांची अपेक्षा होती पण गोलंदाजांनी त्यांना त्यापेक्षा कमी धावा रोखले. हा अप्रतिम प्रयत्न होता. हे लक्ष्य गाठता आले असते.”
स्टॉइनिसच्या अर्धशतकानंतर एलएसजीने निकोलस पूरनच्या नाबाद ३२ धावांच्या खेळीच्या जोरावर पाच गड्यांच्या मोबदल्यात १६३ धावा केल्या. प्रत्युत्तरात शुबमन गिल (१९ धावा) आणि साई सुदर्शन (३१ धावा) यांच्यातील पहिल्या विकेटसाठी ५४ धावा जोडून गुजरात टायटन्सने चांगली सुरुवात केली, पण सातत्याने विकेट्स गमावल्याने संघ १८.५ षटकात १३० धावांवर गडगडला.
हेही वाचा – IPL 2024 CSK vs KKR : चेन्नईविरुद्धच्या सामन्यापूर्वी गंभीरचं मोठं वक्तव्य; म्हणाला, “धोनी हा एक कुशल…”
पाच सामन्यात गुजरातचा तीन वेळा पराभव –
गुजरात टायटन्स संघाने आयपीएलच्या या मोसमात नवा कर्णधार युवा शुबमन गिलसह प्रवेश केला आहे. गेल्या मोसमात त्याने खूप धावा केल्या होत्या. हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्समध्ये दाखल झाल्यानंतर गिलकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे. ५ सामने खेळल्यानंतर गुजरातने दोन जिंकले आहेत. मुंबईचा पराभव करून स्पर्धेची सुरुवात केल्यानंतर संघाला चेन्नईकडून पराभव पत्करावा लागला. यानंतर हैदराबादचा पराभव केला आणि नंतर प्रथम पंजाब किंग्ज आणि नंतर लखनऊ संघाने गुजरातचा पराभव केला.