TATA IPL 2023 Final, CSK vs GT MS Dhoni Most Played Player in IPL: चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आयपीएल २०२३ च्या अंतिम सामन्यासाठी मैदानात उतरताच इतिहास रचणार आहे. या सामन्याद्वारे धोनी एक खास विक्रम आपल्या नावावर करेल. फायनल व्यतिरिक्त हा सामना चेन्नईच्या कर्णधारासाठी खूप खास असेल. स्पर्धेचा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गतविजेता गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. या सामन्याद्वारे महेंद्रसिंग धोनी त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील २५० वा सामना खेळणार आहे. आयपीएलमध्ये हा आकडा गाठणारा धोनी पहिला खेळाडू ठरणार आहे.
आयपीएल २०२३ चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल. या विजेतेपदाच्या सामन्यापूर्वी समारोप समारंभही होणार आहे, जो संध्याकाळी सहा वाजता सुरू होईल. त्याच वेळी, चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा असा खेळाडू आहे. ज्याने सध्याच्या घडीला सर्वात जास्त आयपीएल सामने खेळले आहेत. धोनीने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत २४९ आयपीएल सामने खेळले आहेत. या यादीत मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा २४३ सामन्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसके १०वी फायनल खेळणार –
धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलमध्ये ९ वेळा अंतिम सामना खेळला आहे, ज्यामध्ये संघाने ४ जिंकून विजेतेपद पटकावले आहे आणि ५ विजेतेपदाचे सामने गमावले आहेत. आज सीएसके धोनीच्या नेतृत्वाखाली १०व्यांदा अंतिम सामना खेळणार आहे. जर चेन्नईने हा सामना जिंकला तर सर्वाधिक ५ विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सची ते बरोबरी करतील. चेन्नईने आतापर्यंत चार ट्रॉफी जिंकल्या आहेत.
धोनीची आतापर्यंतची आयपीएल कारकीर्द –
महेंद्रसिंग धोनीने आयपीएल २००८ मध्ये म्हणजे पहिल्या सत्रात पदार्पण केले, तेव्हापासून तो २४९ सामने खेळला आहे. या सामन्यांच्या २१७ डावांमध्ये फलंदाजी करताना धोनीने ३०.०९ च्या सरासरीने आणि १३५.९६ च्या स्ट्राइक रेटने ५०८२ धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून २४ अर्धशतके झळकली आहेत. चेन्नई सुपर किंग्जशिवाय धोनी आयपीएलमध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळला आहे.