IPL 2023, CSK vs GT Qualifier 1 Match Updates : चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा १५ धावांनी करत १०व्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. चार वेळचा चॅम्पियन चेन्नई संघाने शानदार पुनरागमन केले आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सीएसकेने ऋतुराज गायकवाडच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर २० षटकात ७ गडी गमावून १७२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात गुजरात टायटन्सला सर्वबाद १५७ धावाच करता आल्या. गेल्या मोसमात ते प्लेऑफमध्येही पोहोचले नव्हते. धोनीच्या नेतृत्वाखाली संघ आता २८ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पाचव्यांदा चॅम्पियन बनण्यासाठी उतरेल.

दुसरीकडे या पराभवानंतर गुजरात संघाला फायनलमध्ये पोहोचण्यासाठी अजून एक संधी आहे. गुजरात २६ मे रोजी अहमदाबाद येथे क्वालिफायर-२ मध्ये खेळणार आहे. तिथे तो मुंबई इंडियन्स किंवा लखनऊ सुपर जायंट्सशी सामना करेल. बुधवारी (२४ मे) मुंबई आणि लखनऊ यांच्यात एलिमिनेटर सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यातील विजयी संघ क्वालिफायर-२मध्ये जाईल.

गुजरात टायटन्सकडून सलामीवीर शुबमन गिलने सर्वाधिक धावा केल्या. शुबमन गिलने ३८चेंडूत ४२धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ४चौकार आणि १ षटकार लगावला. याशिवाय गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्यासह उर्वरित फलंदाजांनी निराशा केली. मात्र, राशिद खानने शेवटच्या षटकात १६ चेंडूत ३० धावांची झटपट खेळी केली, पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. चेन्नईक़डून गोलंदाजी करताना दीपक चहर व्यतिरिक्त महिश तिक्ष्णा, रवींद्र जडेजा आणि महिषा पथिराना यांनी २-२ विकेट घेतल्या. तर तुषार देशपांडेला एक विकेट मिळाली.

तत्पुर्वी सीएसकेने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ गडी गमावून १७२ धावा केल्या होत्या. सीएसकेकडून ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक ६० धावांची खेळी केली. डेव्हॉन कॉनवेने ४० धावांचे योगदान दिले. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी केली. रवींद्र जडेजाने १६ चेंडूत २२ धावा केल्या.अजिंक्य रहाणे आणि अंबाती रायडूने १७-१७ धावा केल्या. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी एक धाव काढली. चार चेंडूत नऊ धावा केल्यानंतर मोईन अली नाबाद राहिला. गुजरातकडून मोहम्मद शमी आणि मोहित शर्माने प्रत्येकी दोन गडी बाद केले. दर्शन नळकांडे, नूर अहमद आणि राशिद खान यांना प्रत्येकी एक यश मिळाले.

Story img Loader