IPL 2023, Gujarat Titans vs Mumbai Indians Qualifier 2: इंडियन प्रीमियर लीग २०२३चा दुसरा क्वालिफायर सामना आज (२६ मे) गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. उभय संघांमधील हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही संघांसाठी ही लढत ‘करो या मरो’ अशी असणार आहे. सामना जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल. हा सामना जिंकून हार्दिक पांड्याचे लक्ष सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश करण्याकडे असेल. त्याचबरोबर रोहित शर्मा सहाव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करेल. दोन्ही संघात असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांच्यामध्ये सामन्यादरम्यान रंजक लढत पाहायला मिळणार आहे. चला या खेळाडूंबद्दल जाणून घेऊ या.
रोहित शर्मा Vs राशिद खान
गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील दुसऱ्या क्वालिफायरमध्ये रोहित शर्मा आणि राशिद खान यांच्यात रंजक मुकाबला पाहायला मिळेल. आयपीएलमध्ये आतापर्यंत या दोन खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा झाली आहे. रोहित आणि राशिद ६ डावांमध्ये एकमेकांसमोर आले आहेत, ज्या दरम्यान करामती खानने हिटमॅनला चार वेळा बाद केले आहे. रोहित शर्माचा राशिद खानविरुद्धचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही. त्यामुळे आजच्या सामन्यात या दोघांमधील बॉल-बॅटच्या युद्धात कोण जिंकणार याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.
सूर्यकुमार यादव Vs राशिद खान
राशिद खानला आतापर्यंत आयपीएल सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादवच्या आक्रमक खेळीला सामोरे जावे लागले आहे. सूर्याने राशिद खानच्या ४७ चेंडूत ६७ धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे राशिद खान अद्याप सूर्यकुमार यादवला आयपीएलमध्ये बाद करू शकलेला नाही. त्यामुळे ‘मिस्टर ३६०’चा राशिदविरुद्धचा रेकॉर्ड चांगला आहे. ‘द-स्काय’ची ही आकडेवारी पाहता मुंबई इंडियन्सची सर्व भिस्त ही सूर्यावर वरच अवलंबून असणार आहे.
आयपीएल २०२३मध्ये धावांचा पाठलाग करणारी एमआय पलटण
गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स हे इंडियन प्रीमियर लीग २०२३ मध्ये आतापर्यंत सर्वोत्तम पाठलाग करणारे संघ आहेत. या दोन्ही संघांनी लक्ष्याचा पाठलाग करताना ९ पैकी ६ सामने जिंकले आहेत. आयपीएल २०२३ मध्ये गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या तिसऱ्या क्रमांकावर प्रभावी ठरला आहे. या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने ८ डावात ४०च्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्याचवेळी हार्दिक ४ नंबरवर संघर्ष करताना दिसत आहे. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना तो ५ डावात केवळ ११.४च्या सरासरीने धावा करू शकला आहे.
मुंबई इंडियन्सच्या पॉवरप्ले गोलंदाजीत सातत्याने सुधारणा होत आहे. जर आपण संघाच्या पहिल्या १० सामन्यांवर नजर टाकली तर पॉवरप्लेमध्ये त्याचा इकॉनॉमी रेट ९.२ होता आणि सरासरी ५४.९ होता. पण गेल्या ५ सामन्यांत मुंबईने पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी सुधारली. या दरम्यान त्यांची इकोनॉ रेट ८.२ आणि सरासरी २७.३ आहे.