मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल २०२५ मधील दुसरा सामना गुजरात टायटन्सविरूद्ध खेळत आहे. या सामन्यातील मुंबई इंडियन्सची प्लेईंग इलेव्हन पाहून चाहते प्रश्न विचारू लागले आहेत. मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दुसऱ्या सामन्यासाठी कर्णधार हार्दिक पंड्याचं पुनरागमन झालं आहे. यामुळे संघात मोठे बदल झाले आहेत. पण लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे गेल्या सामन्यातील हिरो विघ्नेश पुथूरला संघाबाहेर केलं आहे.

मुंबई इंडियन्स दुसरा सामना गुजरात टायटन्सविरूद्ध खेळत आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा मोसमातील ९वा सामना खेळवला जात आहे. या स्पर्धेत दोन्ही संघांची सुरुवात खराब झाली आणि त्यांना पहिला सामना गमवावा लागला. यामुळे खाते उघडण्याच्या इराद्याने दोन्ही संघ मैदानात उतरले आहेत. बंदीमुळे पहिला सामना खेळू न शकलेला कर्णधार आणि स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या या सामन्यात पुनरागमन करणे ही मुंबईसाठी दिलासादायक बाब होती.

हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकली पण मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनच्या निवडीचा निर्णय सर्वांनासाठीच धक्कादायक होता. मुंबईने या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले, ज्यामध्ये विल जॅक्सच्या जागी हार्दिकने पुनरागमन केले परंतु डावखुरा फिरकी गोलंदाज विघ्नेश पुथूरलाही वगळण्यात आले. त्याच्या जागी अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज मुजीब उर रहमानला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जॅक्सला पर्यायी खेळाडूंमध्ये स्थान मिळाले पण विघ्नेश पुथूरचा यामध्येही समावेश करण्यात आलेला नाही.

विघ्नेशला गुजरातविरूद्ध सामन्यातून का बाहेर करण्यात आले याचे कारण देण्यात आले नाही. त्याला दुखापत झाली आहे की आजारी आहे याबाबत फ्रँचायझीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. २४ वर्षीय फिरकीपटू विघ्नेशने चेन्नईविरुद्धच्या मोसमातील पहिल्याच सामन्यात आयपीएलमध्ये पदार्पण केले. या सामन्यापूर्वी एकही वरिष्ठ स्तरावरील सामना न खेळलेल्या या डावखुऱ्या फिरकीपटूने पहिल्याच षटकात विकेट घेतली आणि नंतरच्या दोन षटकांतही १-१ विकेट घेतली. पदार्पणाच्या सामन्यातच ३ विकेट घेत त्याने त्या सामन्यात मुंबईचा सर्वोत्तम खेळाडू असल्याचे सिद्ध केले. पण त्याला संघाबाहेर करण्याचा निर्णय पाहून सर्वांनाच धक्का बसला.