GT vs PBKS IPL 2025 Match Highlights in Marathi: आयपीएल २०२५ मध्ये अगदी नव्या संघासह उतरलेल्या पंजाब किंग्सने पहिल्याच सामन्यात आयपीएलमधील दुसरी सर्वाेच्च धावसंख्या उभारत सर्वांचं लक्ष वेधलं. इतकंच नव्हे तर श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वाखालील पंजाबने अखेरच्या षटकांमध्ये भेदक गोलंदाजी करत गुजरातवर विजयदेखील मिळवला. यंदाच्या आयपीएल लिलावानंतर पंजाबच्या संघात ग्लेन मॅक्सवेलचं पुनरागमन झालं आहे. पण पहिल्याच सामन्यात तो गोल्डन डकवर बाद झाला आणि नकोसा विक्रम आपल्या नावे केला. पण मॅक्सवेल खरंतर नाबाद होता.
गुजरातचा कर्णधार शुबमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पंजाबने प्रथम फलंदाजी करत धमाकेदार सुरुवात केली. नवोदित प्रियांश आर्यने केवळ २३ चेंडूंत ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४७ धावा केल्या. दुसऱ्या टोकाला कर्णधार श्रेयस अय्यर घट्ट पाय रोवून उभा होता. उमरझाईनेही १६ धावांवर आपली विकेट गमावली. त्यानंतर सगळ्यांना मॅक्सवेलकडून मोळ्या खेळीच्या आशा होत्या, पण पहिल्याच चेंडूवर साई सुदर्शनने त्याला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले.
सुदर्शनच्या चेंडूवर ग्लेन मॅक्सवेल रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला पण चेंडू बॅटला लागला नाही तर पॅडला लागला. गुजरात संघाने अपील केले आणि पंचांनीही बाद झाल्याचा इशारा केला. मॅक्सवेल मैदानावर फार वेळ न थांबता थेट पॅव्हेलियनच्या दिशेने जाऊ लागला. त्यानंतर काही वेळाने रिप्लेमध्ये दिसले की, चेंडू स्टंप्सला हिट करत नसून स्टंप्सच्या वरून जात आहे. म्हणजेच मॅक्सवेल नाबाद होता, पण त्याने रिव्ह्यू घेतला नव्हता.
मॅक्सवेलने जर रिव्ह्यू घेतला असता तर तो बाद झाला नसता. मॅक्सवेलचा रिव्ह्यू न घेण्याचा निर्णय पाहून पंजाबचा कोच रिकी पॉन्टिंग वैतागलेला दिसला. पॉन्टिंगने मान हलवत आपला राग व्यक्त केला. काही वेळाने रिप्लेमध्ये दिसून आलं की मॅक्सवेलने श्रेयस अय्यरबरोबर चर्चा केली होती. मॅक्सवेल श्रेयसला म्हणत होता की चेंडू बॅटला लागलेला नाही. त्यामुळे श्रेयस आणि मॅक्सवेलने रिव्ह्यू न घेण्याचा निर्णय घेतला.
गुजरात टायटन्सविरूद्ध सामन्यातील पहिल्याच चेंडूवरील विकेटसह मॅक्सवेलने नकोसा विक्रम आपल्या नावे केला आहे. आयपीएलच्या इतिहासात ग्लेन मॅक्सवेलच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे. तो १३० डावांमध्ये सर्वाधिक १९ वेळा शून्यावर बाद झाला आहे. पंजाब किंग्सने ज्या प्रकारे सुरूवात केली होती ते पाहता संघ सर्वात मोठी धावसंख्या उभारणार असे दिसत होते, पण गुजरातच्या फिरकी गोलंदाजांनी मॅक्सवेल, स्टॉयनिस, ओमरझाईला माघारी धाडत धावांवर ब्रेक लावला.