आयपीएल २०२४ मधील ४५वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्ध गुजरात टायटन्स यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात आरसीबीने गुजरातवर ९ विकेट्सवर सहज विजय मिळवला. पण तत्पूर्वी शाहरूख खानने संघासाठी महत्त्वपूर्ण इनिंग खेळली होती. या सामन्यात गुजरात टायटन्सचा खेळाडू शाहरूख खानने आरसीबीच्या गोलंदाजांची मधल्या षटकांमध्ये चांगलीच धुलाई केली. शाहरूखने संघ अडचणीत असताना चांगली फलंदाजी करत आपले पहिले अर्धशतक झळकावले आहे. पण त्याला सामन्याच्या काही तासआधीचं कळलं की तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणार आहे, याबद्दल त्याने स्वतच सामन्यानंतर सांगितले.
चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या शाहरूख खानने गुजरातसाठी महत्त्वपूर्ण खेळी केली. गुजरातची सुरूवात फारशी चांगली झाली नाही आणि दोन्ही सलामीवीर स्वस्तात बाद झाले. २४ चेंडूत शाहरूखने पहिले अर्धशतक झळकावले. तर ३० चेंडूत ५ षटकार आणि ३ चौकारांसह शाहरूखने ५८ धावांची शानदार इनिंग खेळली. शाहरूखने आयपीएलमध्ये बॅटनेही आपली चमक दाखवली आहे पण हे अर्धशतकचं त्याचे टी-२० मधील पहिले अर्धशतक ठरले.
पहिल्या इनिंगनंतर आपल्या फलंदाजीबद्दल बोलताना शाहरुखने सांगितले की, “मी पहिल्यांदाच चौथ्या क्रमांकावर (आयपीएलमध्ये) फलंदाजीसाठी आलो. सामन्यापूर्वी आशिष नेहराने मला सांगितले की मी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणार आहे, त्यामुळे मी बसमध्ये मनाची तयारी केली होती. पहिले षटक थोडे अवघड होते. खेळपट्टी कोरडी होती. पण २०० चांगली धावसंख्या आहे. मला फक्त चांगली फटकेबाजी करायची होती. प्रशिक्षकांसोबत नेटमध्ये चांगला सराव केला होता.”