Mumbai Indians vs Gujarat Titans Match Update : आयपीएलच्या १६ व्या हंगामातील ३५ वा सामना आज सायंकाळी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात झाला. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर गुजरात टायटन्सच्या खेळाडूंनी धडाकेबाज फलंदाजी करून २० षटकांत ६ विकेट्स गमावत २०७ धावांपर्यंत मजल मारली. मात्र, या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची मात्र पुरती दमछाक झाली. राशिद खान आणि नूर अहमदच्या अप्रतिम गोलंदाजीमुळं मुंबई इंडियन्सची दाणादाण उडाली. त्यामुळे मुंबई इंडियन्सने २० षटकात ९ विकेट्स गमावत १५२ धावा केल्या. त्यामुळे गुजरात टायन्सचा या सामन्यात ५५ धावांनी विजय झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईसाठी रोहित शर्माने (२), ईशान किशन (१३), कॅमरून ग्रीन (३३), तिलक वर्मा (२), सूर्यकुमार यादव (२३), टीम डेविड (0), पीयुष चावलाने १८ धावा केल्या. गुजरातच्या नूर अहमदने चार षटकात ३७ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. तसंच राशीद खानने चार षटकात २७ धावा देत २ विकेट्स घेतल्या. हार्दिक पांड्याने मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला बाद केलं. मुंबईच्या नेहल वढेरा २१ चेंडूत ४० धावांवर बाद झाला. अर्जुन तेंडुलकर १३ धावा करून तंबूत परतला.

गुजरातच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. शुबमन गिलने अप्रतिम फलंदाजी करत अर्धशतकी खेळी केली. मुंबईच्या कुमरच्या गोलंदाजीवर शुबमन ५६ धावांवर बाद झाल्यानंतर अभिनव मनोहरने धडाकेबाज फलंदाजी केली. अभिनव २० चेंडूत ४२ धावा करून रिलेच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. मात्र, डेविड मिलरने आक्रमक फलंदाजी करून धावसंख्येचा आलेख चढता ठेवला. डेविड मिलरने २२ चेंडूत ४६ धावा कुटल्या. तर राहुल तेवतियाने ५ चेंडूत २० धावांची खेळी साकारली. या धावांच्या जोरावर गुजरात टायटन्सने २० षटकात ६ विकेट्स गमावत २०७ धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे मुंबई इंडियन्सला विजयासाठी २०८ धावांचं लक्ष्य गाठावं लागणार होतं.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gujarat titans wins by 55 runs against mumbai indians rashid khan and noor ahmad bowling spell was outstanding ipl 2023 nss