Chennai Super Kings vs Gujarat Titans, IPl 2023 Final : आयपीएल २०२३ चा फायनलचा सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आज सायंकाळी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगणार आहे. हा सामना पाहण्यासाठी तमाम क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. गुजरातच्या संघाने चमकदार कामगिरी केली आहे. लीग राऊंडमध्ये गुजरातने १४ पैकी १० सामन्यांत विजय मिळवला आहे. परंतु, क्वालिफायर १ मध्ये सीएसकेविरोधात झालेल्या सामन्यात गुजरातचा पराभव झाला. मात्र, दुसऱ्या क्वालिफायरमध्ये गुजरातने मुंबईचा पराभव करून फायनलमध्ये जागा पक्की केली. आजच्या फायनलच्या सामन्यात गुजरातने बाजी मारली, तर सलग दुसऱ्या हंगामात जेतेपदावर शिक्कामोर्तब करण्यास गुजरातला यशस्वी होईल. अशातच गुजरातचे हे पाच खेळाडू चमकले तर धोनीची रणनिती फ्लॉप ठरेल.
१) शुबमन गिल
शुबमन गिलने आयपीएल २०२३ मध्ये कमाल केली आहे. यंदाच्या हंगामात ३ शतक ठोकून गिलने १६ सामन्यांत ८५१ धावा कुटल्या आहेत. शुबमन गिल आयपीएलच्या इतिहासात सर्वात जास्त शतक ठोकणारा तिसरा खेळाडू बनला आहे. गिल जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. फायनल सामना जिंकवून गिलला गुजरातला किताब मिळवून देण्याची संधी आहे. जर आजच्या सामन्यात गिलने पुन्हा एकदा कमाल केली, तर धोनीच्या पलटणसाठी अडचणी निर्माण होतील.
२) मोहम्मद शमी
वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने जबरदस्त गोलंदाजी केली आहे. या हंगामात शमी पॉवर प्ले मध्ये सर्वात जास्त विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. शमी सुरुवातीच्या षटकात विकेट घेण्यात माहिर आहे. अशातच सीएसकेच्या फलंदाजांना शमीच्या भेदक माऱ्यापासून सावध राहावं लागणार आहे. शमीने आतापर्यंत २८ विकेट्स घेण्याची चमकदार कामगिरी केली आहे.
३) राशिद खान
राशिद खान संघाचा सर्वात मोठा एक्स फॅक्टर आहे. या सामन्यात जर राशिदच्या फिरकीने पुन्हा एकदा जादू दाखवली, तर चेन्नईला आयपीएलचा किताब जिंकणं कठीण होईल. राशिदने या हंगामात २७ विकेट्स घेण्याची अप्रतिम कामगिरी केली आहे. तसंच राशिदने मुंबई इंडियन्सविरोधात झालेल्या सामन्यात ३२ चेंडूत ७९ धावांची वादळी खेळी केली होती. यामध्ये त्याने १० षटकार ठोकले होते. त्यामुळे राशिद गुजरातचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू असल्याने सीएसकेला त्याच्यापासून सावध राहावं लागेल.
४) मोहित शर्मा
गोलंदाज मोहित शर्माने जबरदस्त पुनरागमन केलं आहे. क्वालिफायर २ मध्ये मुंबईविरोधात मोहितने ५ विकेट्स घेण्याची चमकदार कामगिरी केली. मोठ्या सामन्यात मोहितने पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध केलं. गुजरातच्या संघाला फायनलचा किताब जिंकायचा असेल तर मोहितला पुन्हा एकदा कमाल करावी लागणार आहे. मोहितने या हंगामात १३ सामन्यात २४ विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे सीएसकेला मोहितच्या गोलंदाजीवर धावा काढण्यासाठी विशेष रणनिती आखावी लागणार आहे.
५) डेविड मिलर
आयपीएलच्या या हंगामात मिलरने खूप जास्त धावा कुटल्या नाहीत. पण डेविड मिलरला ‘किलर मिलर’ म्हणून ओळखलं जातं. आज फायनलच्या सामन्यात मिलर चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. मिलरने खेळपट्टीवर जम बसवला, तर धावांचा पाऊस पाडण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. त्यामुळे सीएसकेपुढं मिलरला बाद करण्याचं मोठं आव्हान असू शकतं.