Ashish Nehra Became Villain For Gujrat Titans : चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाज रविंद्र जडेजाने शेवटच्या चेंडूवर चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला. गुजरात टायटन्सकडून मोहित शर्माने शेवटचं षटक फेकलं. मोहितने १५ व्या षटकातील ४ चेंडू यॉर्कर फेकून फक्त ३ धावा दिल्या. त्यावेळी गुजरातचा विजय जवळपास निश्चितच झाला होता. परंतु, शेवटच्या दोन चेंडुआधी सामना थोड्यावेळासाठी थांबवण्यात आला. त्यावेळी ड्रिंक्स टाईम सुरु होतं. त्याचदरम्यान गुजरातचा प्रशिक्षक आशिष नेहराने जयंत यादवला शर्माच्याजवळ पाठवलं. नेहराने मोहितला शेवटचे दोन चेंडू फेकण्यासाठी टिप्स दिल्या होत्या. परंतु,सामना संपल्यानंतर गुजरातचा पराभवाला चाहत्यांनी नेहराला कारणीभूत ठरवलं. चाहत्यांनी नेहराला सामन्याचा व्हिलन बनवून सोशल मीडियावर भन्नाट मिम्स व्हायरल केले.
चाहत्यांना नेहराचा आला राग
नेहराने दिलेला सल्ला गुजरात टायटन्सच्या कामी आला नाही आणि दोन चेंडूवर जडेजाने १० धावा करून चेन्नईला विजय मिळवून दिला. अशातच सोशल मीडियावर गुजरातच्या चाहत्यांनी नेहराला धारेवर धरलं. चाहते म्हणाले की, जेव्हा मोहित योग्य गोलंदाजी करत होता, तर त्याला शेवटचे दोन चेंडू करण्याआधी का रोखण्यात आलं आणि त्याला सल्ला का देण्यात आला? नेहराने त्यावेळी मोहितला मार्गदर्शन करण्याची गरज नव्हती. त्यावेळी असं काही घडलं नसंत, तर मोहितने त्याच अंदाजात गोलंदाजी केली असती आणि अचूक टप्प्यावर मारा करून जडेजाला धावा काढण्यापासून रोखलं असतं. परंतु, असं झालं नाही.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सोमवारी आयपीएल २०२३ चा फायनल सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगला. गुजरातने २० षटकात २१४ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर पु्न्हा एकदा मैदानात पावसाच्या सरी कोसळल्याने सामना डकवर्थ लुईसनियमानुसार चेन्नईला १५ षटकांत १७० धावांचं लक्ष्य गाठायचं होतं. हा सामना शेवटच्या षटकापर्यंत अटीतटीचा झाला. ऋतुराज गायकवाड, डेवॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, अंबाती रायुडू यांनी अप्रतिम फलंदाजी करून चेन्नईला विजयाच्या दिशेनं नेलं. परंतु, सामन्यात खरा रोमांचा पाहायला मिळाला तो म्हणजे मोहित शर्माच्या शेवटच्या षटकात. कारण शेवटच्या दोन चेंडूवर चेन्नईला १० धावांची गरज असताना रविंद्र जडेजाने चौकार-षटकार ठोकला आणि चेन्नईनं आयपीएलचा पाचवा किताब जिंकला.