Harbhajan Singh’s reaction on Virat-Gautam controversy: आयपीएल २०२३ मध्ये १ मे रोजी खेळलेला ४३वा सामना दीर्घकाळ स्मरणात राहील. हा सामना आरसीबीने १८ धावांनी जिंकला. या विजयापेक्षा लखनऊ सुपर जायंट्स संघाचा मार्गदर्शक आणि आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या वादाची चर्चा जास्त झाली. या वादानंतर बीसीसीआयने विराट, गंभीर आणि नवीन उल हक यांना आयपीएल आचारसंहितेअंतर्गत दंडही ठोठावला आहे. आता माजी स्टार फिरकीपटू हरभजन सिंगने या वादाबाबत ‘गंभीर’ विधान करताना एक व्हिडीओ शेअर केला आहे.
काय म्हणाला हरभजन सिंग?
हरभजन म्हणाला की, “विराट आणि गंभीर यांच्यात जे काही घडले ते क्रिकेटसाठी चांगले नाही. मी श्रीशांतशी जे केले त्याची मला लाज वाटते.” २००८ च्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्यादरम्यान हरभजनने श्रीशांतला कानशिलात मारली होती, ज्यासाठी श्रीशांत आणि हरभजनवर कारवाई करण्यात आली होती. याचा संदर्भ देत हरभजन म्हणाला की, “२००८ मध्ये माझ्या आणि श्रीशांतमध्ये असेच काहीसे घडले होते. आज १५ वर्षांनंतरही मला विचार करायला लाज वाटते, कारण हे योग्य वर्तन नाही.”
हरभजन सिंगने आपली चूक मान्य केली –
श्रीसंतला कानशिलात मारण्याच्या घटनेवर हरभजन म्हणाला की, त्यावेळी मला वाटले की जे काही झाले, मी योग्यच होते. पण नाही, मी जे केले ते चुकीचे होते.” या घटनेनंतर काही वर्षांनी हरभजन आणि श्रीशांत हे २०११चा विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे अविभाज्य भाग होते. योगायोगाने गंभीर आणि कोहली दोघेही त्या संघात होते. आयपीएलमध्ये एकमेकांबद्दल शत्रुत्वाचा इतिहास असलेल्या कोहली आणि गंभीरच्या मनात अनेक वर्षांनंतरही तीच भावना असावी असे मला वाटत नाही, असे हरभजन म्हणाला.
हेही वाचा – IPL Code of Conduct: कोणत्या नियमानुसार कोहली-गंभीरला ठोठावला दंड? कशी निश्चित केली जाते शिक्षा, जाणून घ्या
जे चित्र निर्माण झाले आहे ते क्रिकेटसाठी चांगले नाही –
हरभजन सिंगने आपल्या वक्तव्यात पुढे म्हटले की, “विराट कोहली, तू एक दिग्गज आहेस. तुम्हाला अशा गोष्टीत गुंतण्याची गरज नाही, पण तो इतका तापट खेळाडू आहे की तो खेळात गुंतला आहे असे त्याला वाटले आणि तसे घडले. दोष कोहलीचा, गंभीरचा की नवीनचा, हे लोक शोधण्याचा प्रयत्न करतील, पण जे चित्र निर्माण झाले ते क्रिकेटसाठी चांगले नाही. तुम्ही दोघेही इतके मोठे खेळाडू आहात, ते दोघे माझे धाकटे भाऊ आहेत आणि या स्वातंत्र्याने मी म्हणतो की त्याचा काही उपयोग नाही.”
तो एक छोटासा मुद्दा होता, तिथेच सोडवता आला असता –
हरभजन सिंगने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, “मी माझा एपिसोड पुन्हा पुन्हा आणत आहे, कारण आजही जेव्हा मी मागे वळून पाहतो. तेव्हा मला असे वाटते की मी हे करायला नको होते. याचा मला खूप खेद वाटतो. मला खात्री आहे की आपण दोघे का भांडत आहोत असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. ही एक छोटीशी बाब होती, आपण ती तिथे सोडवू शकलो असतो.”
दोन्ही भाऊ मिळून एक चांगला संदेश देतील –
हरभजन सिंग पुढे म्हणाला, “आपण चांगल्या आठवणी बनवायला हव्यात. कृपया हे सर्व विसरून जा, हे प्रकरण संपवा. एकमेकांना भेटा, एकमेकांना मिठी मारा, क्रिकेट तुम्ही सर्वांनीच निर्माण केले आहे, मुले तुम्हाला पाहत आहेत आणि खेळाचे राजदूत म्हणून त्याचे योग्य प्रकारे प्रतिनिधित्व करणे ही आपली जबाबदारी आहे. म्हणूनच मला आशा आहे की माझे दोन्ही भाऊ मिळून एक चांगला संदेश देतील.”