Harbhajan Singh On MS Dhoni : क्रिकेटच्या मैदानात गगनचुंबी षटकार ठोकून धावांचा पाऊस पाडणाऱ्या महेंद्र सिंग धोनीनं कॅप्टन कूल म्हणून आख्ख्या क्रिडाविश्वात ठसा उमटवला. आयपीएल असो वा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना हजारो चाहत्यांच्या ‘धोनी धोनी’ अशा घोषणांनी क्रिकेटचं मैदान दुमदुमतं. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जला चारवेळा जेतेपद जिंकवून देणाऱ्या धोनीला तर सीएसकेचे चाहते देवच मानतात. कारण धोनी फलंदाजीला मैदानात उतरला की चाहते टीव्हीसमोर आरती ओवाळून त्याला शुभेच्छा देतात.
पण धोनीच्या आयुष्यातही एक दिवस अश्रूंचा पाऊस पडला होता. धोनीचा जीवलग मित्र आणि सहकारी हरभजन सिंगने धोनी एका रात्री ढसाढसा रडल्याचा किस्सा सांगितला आहे. कॉमेंट्री बॉक्समधून संवाद साधताना हरभजनने धोनीच्या भावनिक आठवणींना उजाळा दिला आहे. हरभजनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
इथे पाहा व्हिडीओ
सट्टेबाजीच्या आरोपाखाली चेन्नई सुपर किंग्जवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर २०१८ मध्ये चेन्नईनं पुन्हा वापसी करत मैदानात पिवळ्या रंगाचा भगवा फडकवला. या प्रकरणावर बोलताना हरभजन म्हणाला की, एक किस्सा आहे, जो मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे. सीएसकेवर बंदी घातल्यानंतर दोन वर्षांनी या संघाचं पुनरागमन झालं. त्यानंतर संघाच्या खेळाडूंनी एका डीनर पार्टीचे आयोजन केले होते. पुरुष रडत नाही, असं आपण नेहमी ऐकलं असेल. पण एम एस धोनी त्या रात्री खूप रडला. तो खूप भावनिक झाला होता. मला वाटतं हे कुणालाच माहित नसेल.”
तसंच याबाबत इमरान ताहीरनेही आठवणींना उजाळा देत म्हटलं, मी सुद्धा तिथे होतो. धोनीसाठी तो क्षण खूप भावनिक होता. संघातील खेळाडू धोनीवर किती प्रेम करतात, हे मला त्यादिवशी कळलं. धोनी संघाला एक कुटुंब म्हणून पाहतो. तो क्षण आम्हा सर्वांसाठी खूप भावनिक होता. आम्ही दोन वर्षांनी मैदानात उतरलो आणि ट्रॉफी जिंकली. लोकांनी तर आमच्या नावावर वृद्ध माणसांचा टॅगच लावला होता. पण आम्ही टायटल जिंकलो आणि तो दिवस आमच्यासाठी अभिमान वाटणारा होता.