IPL 2025 LSG vs MI Match Highlights in Marathi: मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने आयपीएल २०२५ मध्ये इतिहास घडवला आहे. मुंबई इंडियन्स संघाचा लखनौच्या संघाने अखेरच्या षटकांमध्ये पराभव करत १२ धावांनी सामना जिंकला. हार्दिक पंड्याची या सामन्यातील अष्टपैलू कामगिरी व्यर्थ ठरली असली तरी त्याने एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे, जो याआधी कोणालाच करता आलेला नाही.

हार्दिक पंड्याने या सामन्यात आपल्या गोलंदाजीत कहर केला. लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात मुंबईचा कर्णधार हार्दिकने एकहाती ५ बळी घेत विक्रम केला. हार्दिकने ऋषभ पंत आणि निकोलस पूरन सारख्या फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले आणि आयपीएलच्या १८ वर्षांच्या इतिहासात कोणत्याच कर्णधाराला न जमलेला दुर्मिळ विक्रम केला आहे.

लखनौच्या एकना स्टेडियमवर, मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनौच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी करत मोठी धावसंख्या उभारली, पण मुंबईसाठी कर्णधार हार्दिकने एका टोकाकडून आघाडी राखली आणि मोठी झुंज दिली. हार्दिकने आपल्या पहिल्याच षटकात एक विकेट घेतली आणि शेवटच्या षटकात २ विकेट्स घेऊन डावही संपवला. हार्दिकने आपल्या प्रत्येक षटकात विकेट्स घेतल्या आणि ४ षटकांत ३६ धावा देत मोठा पराक्रम केला.

९व्या षटकात पहिल्यांदा गोलंदाजी करायला आलेल्या हार्दिकने पाचव्या चेंडूवरच फॉर्मात असलेल्या पूरनला झेलबाद केले. मुंबईसाठी ही मोठी विकेट होती कारण पूरन केवळ १२ धावा करून बाद झाला. हार्दिकने त्याच्या पुढच्या षटकात पुन्हा यश मिळवले आणि यावेळी लखनौचा कर्णधार ऋषभ पंतला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले.

हार्दिक पंड्या आयपीएलच्या १८ वर्षांच्या इतिहासात एका सामन्यात ५ विकेट घेणारा तो पहिला कर्णधार ठरला. याशिवाय हार्दिक पंड्याने त्याच्या टी-२० कारकिर्दीत पहिल्यांदाच ५ विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे. मिचेल मार्श आणि एडन मारक्रम यांच्या वादळी सुरुवातीनंतर मुंबईला विकेट्सची गरज होती. सातव्या षटकात विघ्नेश पुथूरने मार्शला बाद केले, पण नवा फलंदाज निकोलस पूरनने क्रीझवर येऊन आक्रमण करण्यास सुरुवात केली. तेव्हा संघाला सामन्यात परत आणण्याची जबाबदारी स्वतः हार्दिकने घेतली.

हार्दिक पांड्या इथेच थांबला नाही आणि त्याच्या तिसऱ्या षटकातही त्याने संघासाठी यश मिळवले. हार्दिकने १८व्या षटकात दमदार अर्धशतक झळकावणाऱ्या एडन मारक्रमला पॅव्हेलियनमध्ये माघारी पाठवले. २०व्या षटकात आऊट होण्यापूर्वी मिलरने लागोपाठ चेंडूंवर एक षटकार आणि एक चौकार मारला होता. या फलंदाजाने अवघ्या १४ चेंडूत २७ धावा करत संघाला २०० धावांचा पल्ला गाठून दिला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर हार्दिकने आकाश दीपची विकेट घेत आपले ५ विकेट्स पूर्ण करून इतिहास रचला.