MI VS GT IPL 2025: आयपीएल स्पर्धेची पाच जेतेपदं नावावर असणार्या मुंबई इंडियन्स संघाची नव्या हंगामाची सुरुवात चांगली झालेली नाही. चेन्नई सुपर किंग्सपाठोपाठ गुजरात टायटन्सविरुद्ध त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. षटकांची गती राखता न आल्याने कर्णधार हार्दिक पंड्याला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
यंदाच्या हंगामात अशी शिक्षा होण्याची हार्दिकची ही पहिलीच वेळ आहे. योगायोग म्हणजे यंदाच्या हंगामाची सलामीची लढत हार्दिक याच कारणामुळे खेळू शकला नव्हता. गेल्या हंगामातल्या शेवटच्या लढतीत हार्दिकला षटकांची गती राखता आली नव्हती. त्यामुळे त्याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली. हंगाम संपल्याने नव्या हंगामाच्या पहिल्या लढतीसाठी ही बंदीची कारवाई लागू झाली. यामुळे चेन्नईविरुद्ध हार्दिक खेळू शकला नाही. त्याच्याऐवजी सूर्यकुमार यादवने संघाचं नेतृत्व केलं. गुजरातविरुद्धच्या सामन्यात हार्दिक परतला पण ओव्हररेटची चिंता कायम राहिली.
दंडापायी हार्दिकच्या मानधनातून १२ लाख रुपये कापून घेतले जाणार आहेत. नव्या हंगामापासून आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलने षटकांची गती राखता न येण्यासंदर्भात नियम बदलले आहेत. षटकांची गती राखता न आल्यास डीमेरिट पॉइंट लागू होणार आहेत. ३६ महिन्यांसाठी ही व्यवस्था लागू असेल. बंदीच्या कारवाईसंदर्भात हार्दिकला विचारलं असता तो म्हणाला होता, गेल्या हंगामातील शेवटच्या लढतीत अवघ्या काही मिनिटांचा उशीर झाला. त्याचे परिणाम काय होतील मला माहिती नव्हतं. नियमांचं पालन करणं माझं कर्तव्य आहे. आधीच्या हंगामातील कारवाई पुढच्या हंगामात लागू व्हावी का याचा निर्णय आयपीएल प्रशासनाने घ्यायचा आहे.
शनिवारी झालेल्या लढतीत साई सुदर्शनच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर गुजरातने १९६ धावांची मजल मारली. शुबमन गिल आणि जोस बटलर यांनी त्याला चांगली साथ दिली. मुंबईतर्फे हार्दिक पंड्याने २ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माचा अपवाद वगळता मुंबईच्या अन्य फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. त्यांनी १६० धावा केल्या आणि गुजरातने हा सामना ३६ धावांनी जिंकला. प्रसिध कृष्णाने १८ धावांच्या मोबदल्यात २ विकेट्स पटकावल्या. त्यालाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.