आयपीएलच्या १५ व्या पर्वामध्ये सोमवारी झालेल्या सामन्यामध्ये गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्सचे संघ पहिल्यांदाच एकमेकांसमोर उभे ठाकले. या सामन्यामध्ये गुजरातच्या संघाने पाच गडी राखून विजय मिळवला. मात्र हा सामना केवळ दोन संघांमध्ये नव्हता तर दोन भावांमध्ये सुद्धा होता. या अनोख्या जुगलबंदीमुळे क्रिकेट चाहत्यांचंही मोठं मनोरंजन झालं. पांड्या भावंडांच्या या जुगलबंदीमध्ये क्रुणाल आणि हार्दिक यांच्यातील कलगीतुरा मैदानात पहायला मिळाला.
नक्की वाचा >> IPL : मोहम्मद शमीसाठी अमेरिकन पॉर्नस्टारची पोस्ट; थेट शमीला टॅग करत म्हणाली…
हार्दिकच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरातच्या संघाने सामना पाच विकेट्सने जिंकला. मात्र वैयक्तिक पातळीवर हार्दिकला मोठ्या भावासमोर म्हणजेच क्रुणासमोर झुकावं लागल्याचं दिसलं. एका षटकामध्ये क्रुणालला थेट सीमेपार षटकार लगावणाऱ्या हार्दिकला क्रुणालनेच बाद केलं. मात्र यासंदर्भात सामन्यानंतर प्रश्न विचारण्यात आला असता हार्दिकने त्यावर फारच मजेदार उत्तर दिलं.
क्रुणालकडून बाद झाल्याबद्दल बोलताना हार्दिकने, “क्रुणालच्या गोलंदाजीवर बाद झाल्याचं मला जास्त वाईट वाटलं असतं जर आम्ही सामना हारलो असतो. मात्र सध्या ठीक आहे. क्रुणालने मला बाद केलं आणि आम्ही सामना जिंकलो यामुळे आमचं कुटुंब आनंदात आहे. सध्या यामुळे आम्ही न्यूट्र्ल फॅमेली झालो आहोत,” असं उत्तर दिलं. हार्दिक बाद झाल्यानंतर क्रुणालने सेलिब्रेशन टाळत तोंडावर हात ठेवला. तर आपल्या दीरानेच पतीला बाद केल्याचं पाहून हार्दिकची पत्नी असणाऱ्या नताशाने दिलेली रिअॅक्शनही फारच चर्चेत राहिली.
नक्की वाचा >> IPL 2022: …अन् सामना सुरु असतानाच चहलने पत्नी धनश्रीला दिला Flying Kiss
आधीच्या काही पर्वांमध्ये पांड्या बंधू एकाच संघाकडून खेळलेत. हे दोघे पाच वेळा आयपीएल जिंकणाऱ्या मुंबईच्या संघाचा भाग होते. मात्र लिलावामध्ये आता हार्दिकला गुजरातने तर क्रुणालला लखनऊच्या संघाने विकत घेतलंय. पहिल्यांदाच हे दोघे आयपीएलमध्ये एकमेकांविरोधात खेळताना दिसले.