IPL 2025 GT vs MI Hardik Pandya Sai Kishore Fight Video: आयपीएल २०२५ मध्ये गुजरात टायटन्स संघाने मुंबई इंडियन्सचा ३६ धावांनी पराभव करत विजयाचं खातं उघडलं. यासह मुंबईला सलग दुसऱ्या सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. या सामन्यात गुजरातच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत मुंबईला धावा करण्याची संधी दिली नाही. दरम्यान साई किशोर आणि हार्दिक पंड्या यांच्यात अखेरच्या षटकांमध्ये वादावादी झालेली पाहायला मिळाली, ज्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.
गुजरातचा माजी कर्णधार हार्दिक पंड्या आणि संघाचा गोलंदाज आर साई किशोर यांच्यात काहीही न बोलता बाचाबाची झाली, जिथे दोघेही रागाने एकमेकांकडे पाहत होते आणि रागरागात वाद घालण्यासाठी एकमेकांच्या दिशेने जात होते. पण पंचांनी मध्यस्थी केली.
अहमदाबादच्या मैदानावर झालेल्या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना मुंबईला विजयासाठी १९७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात मुंबईने १३व्या षटकापर्यंत ४ गडी गमावून केवळ १०८ धावा केल्या होत्या. ४ विकेट्स गेल्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्या मैदानावर आला पण त्यालाही मोठे फटके खेळण्यात सतत अडचणी येत होत्या. त्यानंतर १५ वे षटक आले जेव्हा डावखुरा फिरकी गोलंदाज आर साई किशोर गोलंदाजी करत होता.
१५व्या षटकातील पहिल्या दोन चेंडूंवर हार्दिकला एकही धाव करता आली नाही. हार्दिक पंड्यावर दबाव कायम ठेवण्यासाठी साई किशोर चेंडू उचलताना त्याच्याकडे रागात पाहू लागला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर त्याने हार्दिकला फटका खेळता आला नाही. हार्दिकला या चेंडूवर पुढे जाऊन मोठा फटका खेळायचा होता पण तो केवळ चेंडूचा बचाव करू शकला. इथूनच साई किशोर आणि हार्दिक एकमेकांकडे रोखू लागले. यादरम्यान हार्दिकने एकदा हाताने काही हावभावही केले. दोघेही जवळपास १० सेकंद एकमेकांकडे रागाने पाहत राहिले.
साई किशोर आणि हार्दिक एकमेकांकडे पाहत होते तितक्यात हार्दिक त्याच्या दिशेने आला आणि पंचांनी मध्यस्थी केली. साई किशोरचे हे शेवटचे षटक होते, तर हार्दिकही यानंतर फार काळ मैदानावर टिकू शकला नाही. मात्र, सामना संपल्यानंतर दोघांनीही हे भांडण विसरून आनंदाने हस्तांदोलन केले आणि नंतर एकमेकांना जोरात मिठी मारली.
GAME ?
— Star Sports (@StarSportsIndia) March 29, 2025
Hardik Pandya ⚔ Sai Kishore – teammates then, rivals now! ??
Watch the LIVE action ➡ https://t.co/VU1zRx9cWp #IPLonJioStar ? #GTvMI | LIVE NOW on Star Sports 1, Star Sports 1 Hindi, & JioHotstar pic.twitter.com/2p1SMHQdqc
यानंतर साई किशोरनेही सामन्यानंतर मुलाखतीदरम्यान याबद्दल सांगितले की, हार्दिक हा त्याचा खूप चांगला मित्र आहे आणि हे सर्व मैदानात चालतं. मैदानात दोघेही एकमेकांचे प्रतिस्पर्धी असून सामन्यातही अशीच आक्रमकता व्हायला हवी, असे तो म्हणाला.