Delhi Capitals vs Mumbai Indians Highlights: हार्दिक पंड्याच्या नेतृत्त्वाखालील मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सने १० धावांनी पराभव केला. या पराभवासह मुंबईला यंदाच्या मोसमातील सहावा पराभव पत्करावा लागला आहे. या साधारण कामगिरीसह मुंबई यंदाच्या मोसमात नवव्या स्थानावर आहे. दिल्ली कॅपिटल्सविरूद्धच्या सामन्यात मुंबईच्या संघाने सामना का गमावला, याचे कारण हार्दिक पंड्याने सांगितले आहे.
दिल्लीने प्रथम फलंदाजी करत ४ बाद २५७ धावा केल्या. दिल्लीच्या टॉप-४ फलंदाजांनी शानदार फलंदाजी केली. जेक फ्रेझरने ८४ धावांच्या शानदार खेळीसह दिल्ली कॅपिटल्सने पहिल्यांदाच आयपीएलच्या इतिहासातील मोठी धावसंख्या उभारली. जेक फ्रेझरने ८४ धावा, अभिषेक पोरेलने ३६ धावा, शाई होपने ४१ धावा तर ट्रिस्टन स्टब्सने ४८ धावा करत संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात मदत केली.
दिल्लीने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरूवात चांगली झाली असली तरी संघाने पॉवरप्ले मध्ये रोहित शर्मा (८), इशान किशन (२०), सूर्यकुमार यादव (२६) हे स्वस्तात बाद झाले. तिलकने ६३ धावांची शानदार खेळी केली. तर पंड्यानेही ४६ धावांची चांगली खेळी केली. पण संघाने ठराविक अंतराने गमावलेल्या विकेट्समुळे विजय मिळवण्यात अपयशी ठरला.
पंड्याने संघाच्या पराभवाचे कारण सांगताना म्हणाला, “सध्या हा खेळ अधिकाधिक अटीतटीचा होत आहे. याआधी काही षटकांच्या फरकाने विजय मिळत असे, आता चेंडूचा फरक राहिला आहे, अशा सामन्यांमुळे गोलंदाजांवर खूप दडपण येते. आम्ही सामन्यात कुठे कमी पडलो यापैकी एक निवडायचे असेल तर, मी म्हणेन मधल्या षटकांत आम्ही जोखीम पत्करत धावा करायला होत्या. अक्षर पटेलविरूद्ध डावखुऱ्या फलंदाजांनी फटकेबाजी करायला हवी होती. खेळाच्या दृष्टीने हे आम्हाला जमले नाही. जेक फ्रेझर मॅकगर्कने जोखीम पत्करत फलंदाजी केली आणि त्याने मैदानाचा योग्यरितीने वापर करत खूप चांगला खेळला. त्याच्या या खेळीतून त्याची निर्भयता दिसून येते.” नाणेफेकीच्या निर्णयावेळी काही वेगळा निर्णय घ्यायला हवा होता का हे त्याला विचारले तेव्हा त्याने नाही असे उत्तर दिले.